आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन वर्षांत आठ कोटी रुपये गेले ‘खड्डय़ा’त

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - पावसाळा सुरू होताच रस्ते खड्डय़ांत जातात. वाहनचालकांची ओरड सुरू होताच महापालिकेतर्फे डागडुजीची मोहीम हाती घेतली जाते. त्यावर खर्च केला जातो. पुढल्या पावसात पुन्हा खड्डे तयार होतात. गेल्या तीन वर्षांत खड्डे बुजवण्यावर आठ कोटी रुपये खर्च झाले आहेत. एवढा पैसा ओतूनही अशी अवस्था का, याचा शोध ‘दिव्य मराठी’ने घेतला. तेव्हा तज्ज्ञांनी सांगितले की, डांबरीकरण करताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला उतार हवा, पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी ड्रेनेज हवे. एवढय़ा साध्या आणि सहज गोष्टींकडे महापालिकेचे अभियंते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. त्यामुळेच रस्ते खड्डय़ांत जातात.

औरंगाबाद महापालिका दरवर्षी सुमारे 20 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे डांबरीकरण करते. ते करताना पाण्याचा निचरा व्हावा यासाठी दोन्ही बाजूने व्यवस्था केलीली असावी. मधला भाग उंच असावा, आडवा उतार असावा असा नियम आहे. मात्र, शहरातील अनेक रस्त्यांवर त्याचे पालन होत नाही. त्यामुळे पाणी साचून रस्ते खराब होत आहेत. 2009 ते 2012 कालावधीत खड्डे बुजवण्यावर आठ कोटी खर्च झाले. या वर्षीही अडीच कोटींपेक्षा अधिक रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

महापालिकेत कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंत्यांची संख्या 65 आहे. लोकप्रतिनिधी म्हणून 105 नगरसेवक मनपाचा कारभार पाहतात. प्रत्येक काम दर्जेदार करण्याची जबाबदारी या सर्वांवर आहे. मात्र, त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही.

कोण काय म्हणाले
नव्या रस्त्यांमध्ये दर्जा वाढवण्यात येत आहे
शहरातील बहुतांश रस्ते 25 ते 30 वर्षांपूर्वीचे आहेत. त्यामुळे आता त्यांची बांधणी खिळखिळी झाल्याने खड्डे पडत आहेत. जड वाहनांमुळे खड्डय़ांचे प्रमाण वाढते. नव्याने तयार होत असलेल्या रस्त्यांमध्ये बांधणीचा दर्जा वाढवण्यात येत असून पाणी साचणार नाही याचीही काळजी घेतली जात आहे. सिकंदर अली, कार्यकारी अभियंता, मनपा.

पाण्यासाठी उतार नाही
रस्ता तयार होतानाच त्याचे काम गुणवत्तेनुसार होणे आवश्यक असते, पण त्याकडे दुर्लक्ष होते. देखभाल दुरुस्तीही वेळेवर केली जात नाही. त्यामुळे छोट्या खड्डय़ांचे रूपांतर मोठय़ा खड्डय़ात होते. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी उतार दिला जात नाही. त्यामुळेही खड्डे पडतात. प्रदीप देशपांडे, आर्किटेक्ट

वीतभर खड्डा फूटभर!
पाणी वाहून जाण्यासाठी रस्त्यावर योग्य उतार असावा, हा साधा नियम आहे. मात्र, बहुतांश रस्त्यांवर असा उतार दिला जात नाही. एक खड्डा झाल्यावर तो तत्काळ बुजवला जात नाही. तेथे पाणी साचून वीतभर खड्डा फूटभर होतो. त्यामुळे रस्ते खराब होत आहेत. समीर राजूरकर, नगरसेवक

नियंत्रण नाही
ठेकेदारांवर मनपाच्या अधिकार्‍यांचे नियंत्रण नसल्याने निकृष्ट दर्जाचे काम होते. रस्त्यावर पाणी साचू नये याबाबत आधीच नियोजन करण्याबाबत काळजी घेतलीच जात नाही. म्हणूनच औरंगाबादेतील सर्व रस्त्यांवर खड्डे झाले आहेत. राजू वैद्य, नगरसेवक

असा ठरतो रस्ता
1. वॉर्डातील रस्त्यांचे डांबरीकरण करण्याचा प्रस्ताव नगरसेवक वॉर्ड अधिकार्‍यांकडे देतात.
2. वॉर्ड अधिकारी रस्त्याची पाहणी करतात.
3. पाहणीचा अहवाल कार्यकारी अभियंत्यांपर्यंत जातो.
4. महापौर, पदाधिकार्‍यांच्या मान्यतेने तरतूद केली जाते.
5. कार्यकारी अभियंत्यामार्फत निविदा काढल्या जातात.
6. निविदांना स्थायी समितीत मंजुरी दिली जाते.
7. कार्यकारी अभियंता ठेकेदाराला कार्यादेश देतात.
8. रस्त्याच्या कामावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी कनिष्ठ अभियंत्यावर दिली जाते.
9. कामाचा अहवाल कनिष्ठ अभियंता उपअभियंत्यामार्फत कार्यकारी अभियंत्याकडे देतो.
10. कार्यकारी अभियंत्याने हिरवा कंदील दाखवल्यावरच ठेकेदाराला बिल दिले जाते.

पाणी वाहून जाण्याची व्यवस्था असते, पण..
पाणी साचू नये यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उतार दिला जातो. पण लोक नळ कनेक्शन, मंडप, ड्रेनेजलाइनसाठी खोदकाम करतात आणि ते बुजवले जात नाहीत. रस्त्यांच्या दुतर्फा असणार्‍या गटारींत कचरा टाकतात. त्यामुळेही पाणी तुंबते. रस्त्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी लोकांनी घेतली तरी पुष्कळ फरक पडू शकतो. हेमंत कोल्हे, कार्यकारी अभियंता, मनपा