आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

18 महिन्यांपूर्वी उद्घाटन होऊनही रस्ता अपूर्णच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - सत्ताधारी शिवसेनेतील गटातटाच्या राजकारणातून घातलेला खोडा आणि कंत्राटदाराने अर्धवट सोडलेले काम यामुळे त्रिमूर्ती चौक ते आकाशवाणी हा दीड वर्षापासून तयार होत असलेला रस्ता शहरातील अतिवाईट रस्त्यांच्या यादीत वरच्या क्रमांकावर आला आहे. आकाशवाणीपासून सुरू होणारे खड्डे आता विक्रमी मोठे झाले असून नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.

शहरातील रस्ते चांगले का होत नाहीत, यावर मनपातील सत्ताधारी कंत्राटदारांकडे बोट दाखवतात, तर कंत्राटदार बिले मिळत नसल्याच्या तक्रारी करतात. दुसरीकडे मनपा प्रशासन काहीच कारवाई करीत नाही ही वस्तुस्थिती आहे. या सर्वात शहराची धूळधाण उडाली असून कर भरणार्‍या नागरिकांचा कुणीच विचार करीत नसल्याचे स्पष्ट दिसते. त्याचे चपखल उदाहरण त्रिमूर्ती चौक ते आकाशवाणी हा रस्ता आहे.

एक किलोमीटर लांबीच्या या रस्त्याचे बीओटीतून काम करण्याचा निर्णय मनपाने घेतला आणि दीड वर्षापूर्वी या कामाचे उद्घाटनही झाले. मनपाच्या प्रत्येक कामात लक्ष घालणारे शिवसेनेचे उपनेते खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते या कामाचे उद्घाटन झाले. त्रिमूर्ती चौकाकडून डांबरीकरणाचे काम सुरू झाले आणि पुढे उतारावर पाणी साचते तिथेच ते अडकले. त्यानंतर कामाचा पाठपुरावा केला नाही.

हा रस्ता तीन नगरसेवकांच्या वॉर्डांत येतो. शिवसेनेचे सुरेंद्र कुलकर्णी, शोभा काळे आणि भाजपचे संजय केणेकर हे ते तीन नगरसेवक. त्यांनी हे अर्धवट काम पुरे करण्यासाठी पाठपुरावा केल्याचा दावा केला असला तरी काडीचे काम झाले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेतील गटातटाच्या राजकारणात ‘नकोशा’ नगरसेवकांच्या कामात खोडा घालण्याचे जे काही प्रकार झाले त्यात हा रस्ता मोडतो. परिणामी या रस्त्यावरून रोज असह्य त्रास सहन करीत ये-जा करणार्‍या नागरिकांचा विचार कुणीच करत नसल्याचे दिसते.

नगरसेवक सुरेंद्र कुलकर्णी म्हणाले की, मी या रस्त्याच्या कामासाठी सतत भांडलो. कंत्राटदार काम करीत नाही, मनपाचे प्रशासन काम करीत नाही. ज्या कामाचे उद्घाटन सत्ताधारी शिवसेनेचे खासदार करतात तेच काम होत नाही.

लोकांचा संताप आम्हाला सहन करावा लागत आहे. कंत्राटदार हरविंदरसिंग म्हणाले की, मनपाकडे आमचे पैसे थकले आहेत तरीही आम्ही त्रिमूर्ती चौकाकडून काम करीत आलो. उतारावरील मंदिराजवळ नुकतेच पेव्हर ब्लॉक्स टाकण्यात आले होते. ते लगेच उखडले.‘चर्चा’ होईल म्हणून काम थांबवावे लागले. शिवाय या भागातील ड्रेनेजलाइनही हटवण्यात आली नव्हती.

ती आता जून महिन्यात हटवण्यात आली. अशा सुंदोपसुंदीत हा रस्ता अडकला असून नागरिकांचे भोग संपण्याची चिन्हे दिसत नाहीत.

एक रुपयाही मिळाला नाही
आम्ही काम सुरू केले, पण काही अंतरानंतर ते थांबवावे लागले. ड्रेनेजचे काम बाकी होते, पेव्हर ब्लॉकचा मुद्दा होता. आजतागायत आम्हाला या कामाचा एक रुपयाही मिळालेला नाही. पण तरीही हा रस्ता आम्ही डिसेंबरपर्यंत पूर्ण करणार आहोत. - हरविंदरसिंग, कंत्राटदार

प्रशासन शहराशी खेळत आहे
महानगपालिका प्रशासन अतिशय निगरगट्ट बनले असून ते या शहराशी खेळत आहे. खासदारांनी उद्घाटन केलेले काम पूर्ण न करण्याइतपत प्रशासन मुजोर बनले आहे. त्यात कंत्राटदाराने काम थांबवल्याने हा रस्ता 18 महिन्यांपासून तयार होऊ शकलेला नाही. - सुरेंद्र कुलकर्णी, नगरसेवक