आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विघ्नहर्त्याच्या वाटेत खड्डय़ांचे विघ्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मनपाच्या कृपेने यंदा विघ्नहर्त्याचे आगमन झाल्यावरही खड्डय़ांचे विघ्न काही टळणार नाही, असे दिसते. मनपाने आता खड्डे बुजवण्याचे काम सुरू करण्याचा निर्णय घेतला असून 8 सप्टेंबरपर्यंत गणेश विसर्जन मार्गावरील खड्डे तातडीने बुजवण्याचे व नंतर शहराच्या इतर भागांतील कामे हाती घेण्याची घोषणा केली आहे. स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी हताश होत या खड्डय़ांचे काही होणार आहे का, असा प्रश्न विचारल्यावर ही घोषणा करण्यात आली.

शहरातील 20 हजार खड्डय़ांनी नागरिक हैराण झाले आहेत. आधी पावसाचे कारण सांगत वेट मिक्स अर्थात मुरूम आणि खडी वापरून हे खड्डे बुजवण्यात आले, पण पावसात ते वाहून गेले. पाऊस थांबल्यावर डांबरीकरणातून खड्डे बुजवण्याचे काम काही मोजक्या भागात झाले व नंतर कंत्राटदारांनी बिलांसाठी मनपाची अडवणूक सुरू केली. आता आयुक्तांवर फौजदारी दावा दाखल झाल्यानंतर खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाले आहे. तरीदेखील या कामांची गती संथ असल्याने गणेशोत्सवापूर्वी हे खड्डे बुजणार नाहीत हे स्पष्ट आहे. थोडक्यात विघ्नहर्त्याच्या वाटेत खड्डय़ांचे विघ्न राहणारच आहे.

तोंड दाखवायला जागा नाही
बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत खड्डय़ांचा विषय निघाल्यानंतर नगरसेवक हताश आणि निराश होते. सुरेंद्र कुलकर्णी म्हणाले, आता खूप झाले. खड्डे कधी बुजवणार ते सांगा. आमची इतकी चेष्टा होत आहे की बाहेर निघणे अवघड झाले आहे. मित्र, नातेवाईक, पाहुणे, नागरिक सगळेच या खड्डय़ांवरून बोलत आहेत. तोंड दाखवायला जागा राहिलेली नाही. गणेशोत्सव तोंडावर आला आहे. त्याआधी शहर खड्डेमुक्त करू, असे आश्वासन दिले होते; पण आता किमान जी मोठी गणेश मंडळे आहेत त्या भागांत तरी आधी खड्डे बुजवा. गणेशोत्सवाआधी काम होणार की नाही हे एकदा सांगून टाका, असे ते वैतागून म्हणाले. त्यावर सभापती नारायण कुचे यांनी पॅचवर्कची चौकशी करण्यासाठी समिती नेमली होती त्याचे काय झाले, असा प्रश्न केला; पण त्याला कुणीच उत्तर दिले नाही. नगरसेविका फिरदोस फातिमा, आगा खान हेदेखील रस्त्यांची कामे होत नसल्याचे सांगत मनपाच्या कारभारावर तुटून पडले.

या चर्चेला उत्तर देताना कार्यकारी अभियंता सिकंदर अली म्हणाले, पाऊस असताना खड्डे बुजवण्यासाठी वेट मिक्स वापरण्यात आले. आता डांबरीकरणाच्या माध्यमातून खड्डे बुजवण्यात येत आहेत. सूतगिरणी, शिवाजीनगर, गारखेडा येथील काम तीन दिवसांत होईल, तर जवाहरनगर पोलिस स्टेशनच्या परिसरात 8 सप्टेंबरनंतर खड्डे बुजवले जातील. सध्या प्राधान्याने गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील खड्डे बुजवण्यात येणार असून ते काम 8 तारखेच्या आत पूर्ण केले जाणार आहे.

यावर कुलकर्णी म्हणाले, पॅचवर्क विशिष्ट भागातच केले जात आहे. ज्योतीनगर, जवाहरनगर, र्शेयनगर या भागांत का कामे होत नाहीत, त्याची कारणे कळायला हवीत. त्यावर सिकंदर अली यांनी एकही खड्डा सोडणार नाही, असे आश्वासन दिले.

खड्डे बुजवण्यात समानता नाही
खड्डे बुजवण्याचे काम सुरू असले तरी आयआरसीच्या नियमाप्रमाणे हे खड्डे बुजवले जात नाहीत, असे निदर्शनास आले आहे. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्थापत्यशास्त्र विभागातील प्रा. डॉ. आर. एम. दमगीर यांनी आयआरसीच्या नियमाप्रमाणे खड्डे चौकोनी करून बुजवल्यास ते काम चांगले होईल आणि वारंवार खड्डे उखडणार नाहीत, असे सांगितले. नगरसेवक जगदीश सिद्ध हे स्थायी समितीने नेमलेल्या पॅचवर्क चौकशी समितीचे सदस्य आहेत. त्यांनी सांगितले की, काही भागांत आयआरसीच्या नियमाप्रमाणे खड्डे बुजवले जात आहेत; पण प्रत्येक ठिकाणी या प्रकारे काम होत नाही.