आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यादीतून तीन रस्ते कमी; खर्च मात्र तीस कोटीच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - तीस कोटी रुपयांत कोणत्या रस्त्यांची कामे करायची हा घोळ अजून संपला नसून यादीत घुसवाघुसवीचे प्रयत्न आजही सुरू आहेत. दुसरीकडे गेल्या सर्वसाधारण सभेतल्या इतिवृत्तात या 20 रस्त्यांची यादी देण्यात आली असून त्यातील 3 रस्ते प्रत्यक्षात वगळण्यात आल्याचे समोर आले आहे. महिनाभरात झालेल्या या घडामोडीत उपमहापौरांनी जोर लावलेला आपल्या वॉर्डातील रस्ताही वगळण्यात आला आहे.

30 कोटी रुपयांत 17 रस्ते करण्याचे काम मनपा करणार आहे. मात्र, हे रस्ते कोणते असावेत यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये धुम्मस सुरू आहे. शिवसेनेने भाजपच्या नगरसेवकांना परस्पर वाटाण्याच्या अक्षता लावत त्यांच्या वॉर्डातील अवघे तीन रस्ते यादीत समाविष्ट करण्यात आले. भाजपने ही यादी आम्हाला अमान्य असल्याचे सांगितले असून आपल्या नगरसेवकांच्या वॉर्डातील रस्तेही घेतले पाहिजेत यासाठी दबाव आणला आहे. गुरुवारी यादी प्रकाशित झाल्यावर खळबळ उडाली.

संख्या कमी केली : येत्या 19 तारखेला मनपाची सर्वसाधारण सभा आहे. त्या सभेच्या विषयपत्रिकेसोबत गेल्या सभेचे इतिवृत्त देण्यात आले. त्यात या 30 कोटींच्या कामाच्या प्रस्तावाबाबत सविस्तर माहिती नमूद करण्यात आली आहे. त्यात चक्क 20 कामांची यादी देण्यात आली आहे. त्यात काल प्रसिद्ध केलेल्या यादीशिवाय क्रांती चौक ते पैठण गेट, पोलिस मेस ते आंबेडकर चौक आणि विवेकानंद चौक ते खिंवसरा लॉन्स आणि ऑगस्ट होम्स ते चौरंगी हॉटेल या रस्त्यांचा समावेश आहे. म्हणजेच 18 ऑक्टोबरच्या यादीतील हे रस्ते नंतर महिनाभरात वगळण्यात आले. शिवाय जळगाव रोड ते राष्ट्रवादी भवन हा रस्ताही वगळण्यात आला. कारण तो राज्य सरकारच्या निधीत येतो. हे करताना त्यात भावसिंगपुरा ते लिटल फ्लॉवर हा रस्ता घुसवण्यात आला.

क्रांती चौक ते पैठण गेट, पोलिस मेस ते आंबेडकर चौक, विवेकानंद चौक ते खिंवसरा लॉन्स, ऑगस्ट होम्स ते चौरंगी हॉटेल हे रस्ते वगळले.

उपमहापौरांचा पत्ता कट
उपमहापौर संजय जोशी हे विवेकानंद चौक ते खिंवसरा लॉन्स, रिद्धी-सिद्धी हॉल ते अष्टपुत्रे हॉस्पिटल व ऑगस्ट होम्स ते चौरंगी हॉटेल या रस्त्यांसाठी प्रयत्न करीत होते. 20 रस्त्यांच्या यादीत त्या कामांचा समावेश होता. नंतर मात्र हे रस्ते वगळण्यात आले.