आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावधान! क्रांती चौकातील धोका कायम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

छोट्या छोट्या कामांसाठीही मनपाला झोळी पसरावी लागत असून स्वत:च केलेला खड्डा बुजवण्याइतकीही मनपाची ऐपत राहिलेली नसल्याचे चित्र निर्माण करण्यात आले आहे. क्रांती चौकात जलवाहिनीसाठी खोदलेला खड्डा कंत्राटदाराकडून फुकटात बुजवला. फुकटात केलेल्या कामाने रंग दाखवला आणि खडी रस्त्यावर आली. विखुरलेल्या या खडीमुळे वाहने घसरत आहेत. या मलमपट्टीमुळे रस्त्यावरील या खड्डय़ाचा धोका कायम आहे.

क्रांती चौकात उड्डाणपुलालगत 15 दिवसांपूर्वी महानगरपालिकेच्या 700 मिमी व्यासाच्या जलवाहिनीचा जॉइंट निखळला. पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता के. एम. फालक यांनी तातडीने दुरुस्तीसाठी रस्ता खोदला. दुरुस्तीनंतर मात्र खड्डा बुजवण्याची विनंती त्यांनी रस्ते विभागाच्या उपअभियंत्यांना केली. त्यांनी क्रांती चौक स्टेशनरोड सिमेंटीकरणाचे काम करणार्‍या जीएनआय कन्स्ट्रक्शनचे हरविंदरसिंह बिंद्रा यांना खड्डा बुजवण्याची विनंती केली. खड्डा नीट न बुजवला गेल्याने खडी उखडली आणि रस्त्यावर पसरली.

पुन्हा विनंती
जलवाहिनी फुटली होती. खड्डा बुजवण्यासाठी कुलकर्णी यांना विनंती केली. त्यांच्या मदतीने हा खड्डा बुजवला. आता त्यावर डांबरीकरण करण्याची विनंती करणार.- के. एम. फालक, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग, मनपा

मदत घेतली
तातडीने खड्डा बुजवणे गरजेचे होते. मी बिंद्रा यांना विनंती केल्याने त्यांनी गरज ओळखून मुरूम, खडी टाकली. आता त्याचे सिलकोट व्हायला हवे.- के. आर. कुलकर्णी,उपअभियंता, मनपा

डीफर्ड योजनेतील काम
हा रस्ता डीफर्ड पेमेंट योजनेत आहे. त्यामुळे त्याच्या कामाची जबाबदारी माझी नाही. -बी. डी. फड, उपअभियंता

डांबरीकरण करू
आधी खड्डा बुजवला. आता मनपाचा मान राखून लवकरच डांबरीकरण करून देऊ.- हरविंदरसिंह बिंद्रा, ठेकेदार