आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साठ वर्षांत आला नाही नशिबी फूटभरही रस्ता !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - निवडणुकीचा हंगाम आहे. विकासाचे दावे-प्रतिदावे करण्याची स्पर्धा सगळ्याच राजकीय पक्षांत सुरू आहे. कोणी ‘अब की बार..’ तर कोणी ‘हर हाथ शक्ती..’ चे नगारे वाजवू लागले आहेत. पण अशा नारे-नगार्‍यांनी उपेक्षा आणि दुर्लक्षाचे बळी ठरलेल्या सामान्यांचे जगणे सुकर होत नाही. त्यांचे खस्ताहाल जिणे संपत नाही. बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील बोरदेवी आणि नवापूर ही दोन गावे त्याचीच बोलकी उदाहरणे.

या गावांत पोहोचायचे तर माजलगाव रस्त्यावरून अडीच-तीन किलोमीटर पायपीट करतच जावे लागते. बैलगाडीखेरीज अन्य कोणतेच वाहन गावात पोहोचणे अशक्य. पावसाळ्यात तर बोरदेवी आणि नवापूरकरांना जिवंतपणीच मरणयातना भोगाव्या लागतात. घरातील कोणाचे निधन झाले तर त्याचे पार्थिव दोन-तीन किलोमीटर खांद्यावरच वाहून न्यावे लागते. गावात फक्त चौथीपर्यंत शाळा. चौथीनंतरच्या शिक्षणासाठी कच्च्याबच्च्यांना मणिकर्णा धरणाच्या पाळूवरील पायवाटेनेच काट्याकुट्यातून पाच किलोमीटर पायपीट करत लिंबारूईच्या शाळेत जावे लागते. पोरीबाळींच्या चिंतेने त्यांना शिक्षणासाठी नातेवाइकांकडे ठेवण्याशिवाय दुसरा पर्याय या दोन्ही गावच्या गावकर्‍यांकडे नाही. स्वातंत्र्याच्या साठ वर्षांनंतरही या गावांच्या नशिबात साधा रस्ताही येऊ शकलेला नाही.

बीडपासून अवघ्या 25 किलोमीटर अंतरावर असलेली ही दोन गावे. शेती हेच उदरनिर्वाहाचे मुख्य साधन. फेब्रुवारीच्या अखेरीस झालेली गारपीट आणि अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका याच दोन गावांना बसला. सुमारे 450 हेक्टरवरील उभी पिके जमीनदोस्त झाली; पण नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी ना महसूल अधिकारी फिरकले ना पाहणी करून दिलासा देण्यासाठी कोणी राजकीय पुढारी फिरकला. गारपिटीने झोडपलेली पिके तशीच मातीत मिळाली; पण सरकार दप्तरी त्याची नोंद काही घेतली गेली नाही. कारण एकच - या दोन्ही गावांना जायला रस्ताच नाही. आहे ती फक्त कच्ची गाडीवाट.

या गावांमध्ये कधी कोणी राजकीय पुढारीही फिरकत नाही. माजी खासदार जयसिंग गायकवाड आणि आमदार अमरसिंह पंडित हे दोनच पुढारी एकेकदा येऊन गेले एवढाच काय तो या गावांचा आणि राजकारण्यांचा संपर्क. माजलगाव रस्त्यावर गाडी लावून अडीच-तीन किलोमीटर पायपीट करायला कोणी धजावत नाही. बीड ते माजलगाव (नाथापूरमार्गे) या रस्त्याच्या आजूबाजूला असणारी ही गावे. या मुख्य रस्त्यापासून तीन ते पाच किलोमीटर आतमध्ये वसलेली. मात्र, गावापर्यंत पोहोचण्यास रानातून, शेतातल्या पायवाटेवरून जावे लागते. त्यामुळे या गावांमध्ये मूलभूत नागरी सुविधाही पोहोचू शकल्या नाहीत. जी व्यथा बोरदेवी आणि नवापूरची तीच नांदलगाव, कोपरा, खेरडा, परभणी आणि ताडसोल या गावांचीही. रस्ता नाही म्हणून सोयी नाहीत, सोयी नाहीत म्हणून शिक्षण नाही, शिक्षण नाही म्हणून प्रगती नाही अशा दुष्टचक्रात ही गावे अडकलेली आहेत. विकासाच्या बाता खुशाल मारा पण आम्हाला साधा रस्ता तरी द्या, एवढीच येथील गावकर्‍यांची मागणी आहे.

शिक्षणाची बोंबाबोंब
बोरदेवी येथे चौथीपर्यंत शाळा आहे. रस्त्याअभावी गावात शिक्षणाचे वारे फिरलेच नाही. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच नवापूरच्या सत्यप्रेम गिरींना मुंबईत शिक्षकाची नोकरी लागली. बोरदेवीतील 80 टक्के ग्रामस्थांचे शिक्षण 10वीच्या आतले आहे. शिक्षणासाठी मुला-मुलींना बीड किंवा इतर ठिकाणी नातेवाइकांकडे ठेवावे लागते.

एकच किराणा दुकान
बोरदेवी आणि नवापूरची लोकसंख्या 1500 च्या घरात आहे. येथे ग्रुप ग्रामपंचायत आहे. दोन्ही गावांसाठी एकच किराणा दुकान आहे. एक पिठाची गिरणी आहे. पावसाळ्यात चार महिने गावाचा संपर्क तुटतो.

कर्जासाठी पायपीट
नवापूर, कोपरा, बोरदेवी आदी गावात बँका नाहीत की कसल्या पायाभूत सुविधा नाहीत. बोरदेवीच्या ग्रामस्थांना 2013 मध्ये पहिल्यांदाच पीक कर्ज मिळाले. विठ्ठल गायवळ यांनी याबाबत सांगितले, बँक ऑफ महाराष्ट्रच्या पिंपळनेर शाखेकडे कर्ज मागितले. मात्र, अधिकार्‍यांनी सुरुवातीला टाळाटाळ केली. नंतर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रयत्न केले. काही महिन्यांनतर 28 हजारांचे पीक कर्ज मंजूर झाले. बोरदेवीचा मी पहिलाच कर्जधारक आहे. त्यानंतर बँकेने नऊ जणांना पीक कर्ज दिले.

बिघडलेले अर्थकारण
गावातील 80 टक्के लोक ऊसतोड मजुरी करतात. बोरदेवी येथील सत्यप्रेम गिरी ही एकमेव व्यक्ती मुंबई येथे शिक्षक म्हणून नोकरी करते, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.

सोयरिकीची अडचण
बोरदेवीला पोहोचण्यासाठी काळ्या मातीतून पायपीट करावीच लागते. त्र्यंबक वणवे यांनी सांगितले, पावसाळ्यात खूप त्रास होतो. रस्ता नसल्याने गुडघ्याइतक्या चिखलातून जावे लागते.

टोलवाटोलवी..
गोपीनाथ मुंडेंपासून सर्वच नेत्यांना रस्त्यासाठी गळ घातली, महसूलच्या अधिकार्‍यांकडे खेटे घातले; पण टोलवाटोलवीखेरीज दुसरे काहीच मिळाले नाही. - विठ्ठल गायवळ, ग्रामस्थ, बोरदेवी
केवळ आश्वासनेच!

उंबरठे झिजवले, पण..
किमान पक्का रस्ता तरी द्या. सर्वच राजकीय पुढार्‍यांचे उंबरठे झिजवले; पण आश्वासनाशिवाय पदरात काहीच पडले नाही. - शांताबाई भारतगिरी, सरपंच, बोरदेवी