आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खराब रस्त्याने बुडवले व्यावसायिकांचे दोन कोटी; नऊ महिन्यांत मोठे आर्थिक नुकसान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- क्रांती चौक ते रेल्वेस्टेशन या अडीच किलोमीटरच्या महाखराब रस्त्याने सुरू केलेल्या छळाच्या कहाण्या संपता संपत नाहीत. नऊ महिन्यांत मुंगीच्या गतीने होणार्‍या या कामामुळे रेल्वेस्टेशन ते पदमपुरा चौकापर्यंतच्या भागातील व्यापार्‍यांना सुमारे दोन कोटी रुपयांच्या व्यवसायावर पाणी सोडावे लागले आहे. एकाच भागाचे खंदकासारखे खोदकाम झाल्यावर ही स्थिती आहे, दुसरी बाजू खोदली तर ‘हरी हरी’ करीत बसण्याचीच वेळ येणार असल्याचे या व्यावसायिकांचे म्हणणे आहे. दुसरीकडे वादग्रस्त कामावरून शिवसेनेत दोन तट पडले असून आमदार संजय शिरसाट यांनी आठ दिवस वाट पाहतो, नाहीतर सर्वपक्षीयांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.

9 महिन्यांपासून लाखो शहरवासीयांचे प्राण कंठाशी आणणार्‍या क्रांती चौक ते रेल्वेस्टेशन रस्त्याच्या कामाबाबत ‘दिव्य मराठी’ने रविवारच्या अंकात आवाज उठवला. हे वृत्त प्रसिद्ध होताच तीव्र पडसाद उमटले. शेकडो नागरिकांनी एसएमएसद्वारे संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या. अडीच किलोमीटरचा एक रस्ता औरंगाबादकरांचे जिणे किती हराम करीत आहे हे सांगणार्‍या कहाण्या या भागातील व्यावसायिक आणि व्यापार्‍यांनी सांगितल्या. 24 कोटी रुपयांच्या कामासाठी या भागात व्यवसाय करणार्‍यांचे दोन कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. रेल्वेस्टेशन ते पदमपुरा चौक या भागातील शंभराहून अधिक दुकानदारांचे प्रचंड नुकसान झाले असून रस्त्याचे काम संपेपर्यंत होणार्‍या नुकसानीने डोळे पांढरे व्हायची वेळ आली. बन्सीलालनगर ते पदमपुरा या रस्त्यावर पश्चिमेकडील बाजूचे म्हणजे अग्निशमन दलाच्या समोरील बाजूचे काम सुरू आहे. या बाजूची सगळी दुकाने साफ बसली आहेत. समोरच्या बाजूने म्हणजे दुहेरी वाहतूक असल्याने त्या भागातील दुकानांमध्ये ग्राहक फिरकायला तयार नाहीत.

आठ दिवसांची डेडलाइन
या रस्त्याच्या कामावरून सत्ताधारी शिवसेनेत मतभेद असल्याचे रविवारी पुन्हा समोर आले. वृत्त प्रकाशित होताच आमदार संजय शिरसाट ‘दिव्य मराठी’शी बोलले. त्यांनी आपण या कामाबाबत बिलकुल समाधानी नसल्याचे सांगितले. दुसरीकडे महापौर कला ओझा यांनी मात्र कामावर समाधान व्यक्त केले. काल माजी सभापती विकास जैन यांनी या कामासाठी बजेट देण्याचे माझे काम होते, ते मी केले, असे विधान केले होते. त्यावर आमदार शिरसाट म्हणाले की, फक्त बजेट देऊन भागत नाही. दिलेले काम चांगले होत आहे की नाही, मुळात ते योग्य गतीने होत आहे की नाही यावर काम पूर्ण होईपर्यंत लक्ष ठेवणे ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे. आठ दिवस मी वाट पाहणार आहे. कामाला वेग आला नाही तर सर्व पक्षीयांना सोबत घेऊन मी रस्त्यावर उतरणार आहे. या रस्त्याचे काम लवकर झालेच पाहिजे, असे त्यांनी ठासून सांगितले. लोकांनीही किती दिवस सहन करायचे, असा सवाल करीत आपली भांडायची तयारी असल्याचे शिरसाट यांनी स्पष्ट केले.

महापौर म्हणतात, कामाचा वेग योग्यच
महापौर कला ओझा यांना याबाबत विचारणा केली असता त्या आधी भडकल्याच. म्हणाल्या, काम नाही झाले तरी ओरड, सुरू झाले तर मंदगतीने होतेय, अशी ओरड होते. पण काम होत होतेय ना? कामाचा वेग समाधानकारक आहे. ड्रेनेज, लाइट, पाणी यांच्या लाइन शिफ्टिंगचे काम सुरू आहे. डिव्हायडरमधील खांबांकडे लक्ष द्यायला जीटीएलला सांगितले आहे. या रस्त्याच्या कामामुळे नागरिकांना त्रास होत असला तरी एवढा मोठा रस्ता होत असल्याने त्यांनी सहकार्य केले पाहिजे. या कामावर आमचे लक्ष आहे.

काय म्हणतात व्यावसायिक ?
3 महिन्यांत 30 लाखांचे नुकसान
या रस्त्यामुळे आमच्या व्यवसायावर खूप मोठा परिणाम झाला आहे. महिन्याला सात ते आठ लाख रुपयांचे नुकसान होत आहे. तीन महिन्यांत 30 लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. रस्ता तयार झाला नसल्यामुळे पार्किंगच उरली नाही. त्यामुळे कोणीही ग्राहक येत नाही. तातडीने हा रस्ता होणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया हॉटेल कीजचे महाव्यवस्थापक गौतम दासगुप्ता यांनी व्यक्त केली.
- गौतम दासगुप्ता, महाव्यवस्थापक, हॉटेल कीज

पुढील सहा महिने दुकाने बंद राहतील
आमचा स्टेशनरीचा व्यवसाय ऐन सीझनमध्ये मारला गेला. गेल्या दशकभरात पहिल्यांदाच हातावर हात ठेवून बसण्याची वेळ आली आहे. आमच्या बाजूचे खोदकाम झाले नसले तरी रस्ता अरुंद आणि खराब असल्याने वाहने थांबवून ग्राहक येत नाहीत. खरेतर सुरू असणारा रस्ता चांगला केला असता तरी आमचा व्यवसाय सुरू राहिला असता. आमच्या बाजूने खोदकाम झाले तर पुढचे सहा महिने दुकान बंदच ठेवावे लागेल.
- योगेश कोटगिरे, विपुल स्टेशनर्स

पुढचा फटका मोठा बसणार
महाविद्यालये सुरू झाल्यानंतर आणि सणासुदीचे दिवस आल्यावर भेटवस्तूंचा सीझन सुरू होतो. पण या खराब रस्त्यामुळे व्यवसायाची वाट लागली आहे. पार्किंग हा सर्वात मोठा प्रश्न या रस्त्याच्या कामामुळे उभा राहिला आहे. आमच्या बाजूचे काम सुरू झाले तर पुढील काळात सर्वांनाच मोठा फटका बसणार आहे. या भागातील व्यापारउदीम संकटात येणार आहे. शेजारीच खाद्यपदार्थ आणि घरगुती वापराच्या वस्तूंचे दुकान आहे. त्याच्या व्यवसायावरही रस्त्याच्या कामाचा प्रचंड परिणाम झाला आहे.
-सुनील शेजुळे, कॉम्प्लिमेंट्स

तीन लाखांचा फटका
काम सुरू असलेल्या भागातील दुकानांचा व्यवसाय साफ बुडाला आहे. माझ्या औषधी दुकानात रस्ता ओलांडून कोणी येऊच शकत नाही. सहा महिन्यांत सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान सोसावे लागले. खोदकाम झाले असल्याने हा खंदक ओलांडून कोण येणार?
- सुनील तांदळे, गायत्री मेडिकल

50 टक्के व्यवसाय बुडाला : रस्त्याच्या कामामुळे या व्यावसायिकांचा व्यवसाय निम्म्यावरच आला आहे. बन्सीलालनगर, गांधीनगर, वेदांतनगर हा उच्चभ्रू भाग आहे. येथील चारचाकीवाले हे या व्यावसायिकांचे ग्राहक आहेत. पण एकेरी रस्त्यामुळे या ग्राहकांना वाहने पार्क करायला जागाच नसल्याने ते दुकानांकडे फिरकायला तयार नाहीत. मागील सहा महिन्यांत या दुकानदारांचा व्यवसाय निम्म्याने कमी झाला आहे. जनरल, स्टेशनरी दुकाने, हॉटेल्स, औषध दुकाने, मिठाई दालने, भेटवस्तूंच्या दुकानांत शुकशुकाट आहे. दिवाळीत मिठाई विक्रेत्यांची दालने ग्राहकांअभावी ओस होती. नुकसान नको म्हणून कमी स्टॉक ठेवलेला बरा, असे त्यांचे आता धोरण आहे. या व्यावसायिकांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना त्रागा व्यक्त केला. रस्ता त्याच्या गतीने होईलदेखील, पण आमचा व्यवसाय बुडाला त्याबद्दल लोकप्रतिनिधी, मनपा, कंत्राटदाराने निदान दिलगिरी तरी व्यक्त करायला हवी, असे उद्वेगपूर्ण उद्गार त्यांनी काढले.

कामाच्या फलकाचा पत्ता नाही : कोणत्याही रस्त्याचे काम सुरू करताना कामाचा तपशील असलेला फलक लावला जातो. या रस्त्याबाबत मात्र असा कोणताही फलक कंत्राटदाराने लावलेला नाही. शिवाय वाहतूक वळवण्यासंदर्भातदेखील फलक लावलेले नाहीत. एकाच बाजूने वाहतूक सुरूअसल्याने या मार्गावर रोज किमान दोन अपघात घडतात. त्यात खराब रस्त्यांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे.

मुख्य अभियंता स्विच ऑफ : या रस्त्याच्या कामाबाबत विचारणा करण्यासाठी मुख्य अभियंता हेमंत कोल्हे यांच्याशी दिवसभर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा मोबाइल रात्री उशिरापर्यंत स्विच ऑफ होता. कार्यकारी अभियंता सिकंदर अली यांनी दिरंगाईसंदर्भात कंत्राटदाराला नोटीस दिल्याचे सांगत हे प्रकरण कोल्हे यांच्याकडे असल्याचे सांगत उत्तर टाळले.