आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थायी समिती बैठकीत खड्ड्यांवर होणार चर्चा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - फोर जी सेवेच्या केबल टाकण्यासाठी रिलायन्स जिओ कंपनीने सारे शहर खोदून ठेवले असून कंपनीवर कारवाई करावी अशी ओरड होत असताना प्रत्यक्षात मनपावरच कारवाई करण्याची वेळ आली आहे. रिलायन्सने खोदकामाची परवानगी घेतानाच त्याच्या दुरुस्तीसाठी म्हणून मनपाकडे पैसे भरले असून मनपाने ते या कामावर खर्चच केले नाहीत व पगारासाठीच ते पैसे खर्च केल्याचे समोर आले आहे. मंगळवारच्या स्थायी समिती सभेत हा विषय गाजण्याची शक्यता आहे.

रिलायन्सचे खड्डे बुजवले जात नाहीत अशी ओरड आतापर्यंतच्या सगळ्याच सर्वसाधारण सभा व स्थायी समित्यांच्या बैठकांत होत होती. पण ना खड्डे बुजवण्यात आले ना रिलायन्सवर कारवाई करण्यात आली. या मागचे गूढ शोधत असताना हाती आलेली माहिती धक्कादायक आहे. रिलायन्सने या खोदकामासाठी मनपाकडे ४० कोटी रुपये भरले. त्यातून मनपाने ते खड्डे बुजवणे अपेक्षित होते. पण हा पैसा रस्त्यांच्या कामासाठी बाजूला ठेवून नंतर तो पगारासाठी वापरण्यात आला.

मंगळवारी स्थायी समितीची बैठक होत असून त्यात या खड्ड्यांचा विषय गाजण्याची चिन्हे आहेत. या निमित्ताने लेखा विभागाला कोंडीत पकडण्याची संधी आली आहे. मनपाने हे खड्डे बुजवले नाहीत पण सर्वेक्षण करून किमान मोजले तरी आहेत. शहरभरात रिलायन्सने केलेल्या खड्ड्यांची संख्या १८६ आहे. वॉर्ड अ मध्ये २३, ब मध्ये ३४, क मध्ये १७, ड मध्ये ५४, इ मध्ये ३१ व फ मध्ये २७ अशी खड्ड्यांची आकडेवारी आहे.