आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेम्पोच्या धडकेत विद्यार्थ्याचा करुण अंत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- रस्त्याच्या कडेला दुचाकी लावून बोलत थांबलेल्या तीन अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना तांदळाने भरलेल्या भरधाव टेम्पोने सोमवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास धडक दिली. यात निखिल तुळशीदास तामोरे (21, रा. दांडी भोईसर, जि. ठाणे) याचा जागीच मृत्यू झाला, तर सचिन चंद्रकांत डावरे (21, रा. कोणांदे, ता. सिन्नर) आणि अनिकेत नामदेव ढाकरे (23, रा. चिपळूण, ता. रत्नागिरी) हे दोघे जखमी झाले. सिडको एन-7 कडे जाणार्‍या रस्त्यावरील रिलायन्स पेट्रोल पंपासमोर हा भीषण अपघात झाला.

टेम्पोने या तिघांना चारशे मीटरपर्यंत फरपटत नेले. अपघातानंतर संतप्त जमावाने टेम्पोवर दगडफेक केली. अपघातातील तिघेही तरुण नायगाव सावंगी येथील औरंगाबाद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये तृतीय वर्षात शिक्षण घेत होते. तिघे दुचाकीवरून (एमएच 20 एएक्स 1035) सिडको एन-5 येथील घराकडे जात होते. या वेळी निखिल हा दुचाकी चालवत होता, तर सचिन आणि अनिकेत हे दुचाकीवर पाठीमागे बसलेले होते. रिलायन्स पंपासमोर गप्पा मारताना सिडको बसस्टँडकडून आलेल्या टेम्पोने (एमएच 20 एटी 1968) या तिघांना उडवले. टेम्पाच्या धडकेने निखिलचा मेंदूच अक्षरश: बाहेर पडला, तर अनिकेतच्या डोक्याला, हाता-पायाला आणि सचिनच्या उजव्या हाताला आणि पायाला दुखापत झाली. टेम्पो चालकाने घटनास्थळावरून धूम ठोकली. अनिकेतला काही नागरिकांनी तत्काळ घाटीत दाखल केले, तर निखिलचा मृतदेह पोलिसांनी घाटीत नेला. दुपारी चार वाजेपर्यंत घटनास्थळी तणावाचे वातावरण होते.

टेम्पोखाली दुचाकी अडकली
टेम्पोखाली अडकलेली दुचाकी काढताना पोलिसांना अथक परिश्रम घ्यावे लागले. दुचाकी निघत नसल्याने क्रेनच्या साहाय्याने टेम्पोचा समोरील भाग उचलून दुचाकी हटवण्यात आली. टेम्पोचालक सय्यद वसीम रज्जाक (रा. शहाशोक्ता कॉलनी, रेल्वेस्टेशन परिसर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.