आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोस्टर(बाज) उतरले, 300 बॅनर जप्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फुकटात प्रसिद्धी मिळवणा-या आणि चमकोगिरी करणा-या ‘पोस्टर बॉईज’च्या कारनाम्यांवर डीबी स्टारने प्रकाश टाकताच शहरभर प्रतिक्रिया उमटायला लागल्या. त्यामुळे पालिकेने 3 दिवसांत 300 पेक्षा जास्त बॅनर उतरवले, तर कोचिंग क्लासेसनी स्वत:हून स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. एकूणच पोस्टरबरोबर पोस्टरबाजदेखील जमिनीवर आले आहेत.

विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. त्यामुळे गल्लोगल्ली असणारे नेते-कार्यकर्ते होर्डिंग, पोस्टर आणि बॅनरने शहराचे विद्रूपीकरण करत आहेत. त्यावर डीबी स्टारने 2 ऑगस्ट रोजी ‘पोस्टर बॉईज पुन्हा प्रकटले’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करून या सर्व चमकोगिरी करणा-यांचा बुरखा फाडला. सोबतच या विद्रूपीकरणात भर टाकणा-या कोचिंग क्लासेसवाल्यांनाही उघडे केले. व्हाट्स अ‍ॅप, फेसबुकसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातूनही हे वृत्त झपाट्याने सर्वत्र पसरले. सर्वच स्तरांतून शहराचे सौंदर्य बिघडवणा-या पोस्टर बॉईजचा निषेध करणा-या जळजळीत प्रतिक्रिया नोंदवण्यात आल्या.

...आणि उकिरडे साफ झाले
पहिल्या दिवशी मनपाने विविध पक्षांचे झेंडे, बॅनरबरोबरच 30 पेक्षा जास्त बोर्ड, होर्डिंग काढले. त्यानंतर सलग तीन दिवस कारवाई करून जालना रोड, गजानन महाराज मंदिर रोड, दर्गा रोड, जळगाव रोड आदी रस्त्यांवरील पथदिव्यांच्या खांबांना लावलेले तिनशेपेक्षा जास्त बॅनर आणि होर्डिंग उतरवले. काही रस्त्यांवर अधिकृत जाहिरात फलक लावण्यासाठी पथदिव्यांवर फे्रम चढवण्याचे कामही मनपाने हाती घेतले आहे. त्यामुळे पोस्टर, बॅनरमुळे झालेला शहराचा कचरा साफ झाला. भाजपचे अतुल सावे यांनी गजानन महाराज मंदिर चौकात वाहतुकीला अडथळा निर्माण करत औरंगाबादकरांना दिलेल्या श्रावणाच्या अनधिकृत शुभेच्छा पालिकेने काढून घेतल्या, तर आजी-माजी मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी काँगे्रसचे जितेंद्र देहाडे आणि अशोक उकिर्डे यांनी मुख्य रस्त्यांवर चमकोगिरी करत शहराभर केलेला कचराही मनपाने साफ केला. दुसरीकडे रिपाइंचे बॅनर, काही क्लासेस, खासगी संस्थांचे कॅलेंडर, फलक, होर्डिंगही पालिकेने हटवले आहेत.

क्लासेसवर कारवाई नाही
विद्रूपीकरणात खासगी क्लासेसच्या बॅनर आणि पॉम्प्लेटमुळे सर्वत्र विचित्र परिस्थिती आहे. यामध्ये श्री ट्यूशन, अ‍ॅक्टिव्ह कॉमर्स क्लासेस, जोशीज् अ‍ॅकॅडमी, एक्स्पर्ट क्लासेस, टेक्नोसीन करिअर अ‍ॅकॅडमी, राजयोग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन क्लास, ज्ञानप्रबोधिनी, व्हिजन अ‍ॅकॅडमी, सम्राट क्लास, सरस्वती क्लासेस, विवेका क्लासेस, वेल डन कॉमर्स क्लास आदी क्लासेसचा समावेश आहे. मात्र, यांच्यावर मनपाने अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही.

संवेदनशील रिलायबल, मुजोर एसीआय
डीबी स्टारचे वृत्त आणि पाठपुरावा अनेकांना झोंबला, तर काहींनी संवेदनशीलता दाखवत चूक दुरुस्त केली. रिलायबल क्लासेसने शहरात लावलेले पोस्टर आणि बॅनर हटवण्यास सुरुवात केली आहे. क्लासचे संचालक धनंजय आकात यांनी, आपण शहराबाहेर असल्याने ही चूक झाली. मात्र, आता हे पोस्टर हटवण्यासाठी स्टाफला कामाला लावले आहे. येत्या दोन दिवसांत सर्व पोस्टर काढू, अशी ग्वाही आकात यांनी दिली. मात्र, दुसरीकडे एसीआय या क्लासचे मॅनेजन अरुण सिंग यांनी मुजोरी कायम ठेवत, ‘आता पोस्टर काढण्याची आवश्यकता नसून पावसाच्या पाण्याने आपोआप ते धुऊन जातीलच,’ असे उत्तर दिले.