आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिमेंटचा रस्ता मुरमाचा केला, भूमिगत गटार योजनेचे काम रहिवाशांच्या मुळावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - अनेक वर्षांच्या मागणीनंतर मोठ्या मुश्किलीने सिमेंट काँक्रीटचा रस्ता झाला. पण तीन वर्षांतच त्यालाही जणू दृष्ट लागली. भूमिगत गटार योजना राबवण्यासाठी हा रस्ता खोदण्यात आला. पण काम सुरू आहे म्हणत तो पूर्ववत झालेला नाही. खडे आणि मुरमाड टाकून ठेकेदाराची माणसे पसार झाली आहेत. त्यामुळे गेल्या महिन्यांपासून लोक या खडकांमधूनच जा-ये करतात. गारखेड्यातील तिरुपती विहार ते भगतसिंगनगर आणि माेरेश्वर सोसायटीच्या रस्त्याची ही भयंकर परिस्थिती.
शहरात भूमिगत गटार योजनेचे काम सुरू आहे. हे काम जुलै २०१४ रोजी नवी मुंबईतील खिल्लारी इन्फ्रास्ट्रक्चर यांना देण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत गारखेड्यातील तिरुपती विहार ते भगतसिंगनगर आणि माेरेश्वर सोसायटीतील अंतर्गत साडेसात मीटरचा रस्ता खोदून त्यात भूमिगत गटराचे पाइप टाकण्यात आले. मात्र, तीन महिन्यांपासून रस्त्यावर मुरूम पसरवून ठेकेदार पसार झाला आहे.

तीनवर्षांपूर्वी उजळले होते भाग्य
गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या या रस्त्याचे भाग्य काही वर्षांपूर्वी उजळले होते. तीन वर्षांपूर्वीच या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले होते. यासाठी १० लाखांचा निधी खर्च करण्यात आला होता, पण आता हाच नवाकोरा रस्ता खोदून त्याखाली पाइप टाकण्यात आले आहेत. पाइप टाकून त्यावर रस्ता उकरून निघालेला मुरूमच पसरवण्यात आला. काम झाल्यावर रस्ता पूर्ववत करणे आवश्यक होते. पण ते दूरच उलट टाकलेल्या मुरुमावर रोलरने दबाई करण्याची तसदीही घेतली नाही. त्यामुळे या रस्त्यावरून गाड्या तर दूरच साधे पायी चालणेही मुश्किल होत आहे. कॉलनीतील ज्येष्ठांना तर या खडकाळ मुरुमावरून चालताच येत नसल्याचे परिसरातील प्रा. नामदेव काळे, बी. के. पवार, भारती बनकर, प्रमिलाबेन शहा, अरुणा देवळाणकर, रजनी धर्माधिकारी, चंद्रकला कुंठे, स्मिता देवळाणकर, गणेश कुलकर्णी अादी नागरिकांनी सांगितले.

आमची घरेया भागात आहेत. त्यामुळे रोज जा-ये करावीच लागते. बाहेर जायच्यावेळी तर गाडी काढण्याचाही आता कंटाळा येतो. त्यापेक्षा चालत गेलेले बरे असे वाटते. पण चालण्यालायकही हा रस्ता राहिलेला नाही. ज्येष्ठांना तर संध्याकाळी फेरफटका मारायचा तरी अवघड होते. जयंतधर्माधिकारी, चिमनलाल शहा, गणेश कुलकर्णी

वर्दळीचा रस्ता
शिवाजीनगर सूतगिरणी चौकापासून मोरेश्वर सोसायटी मार्गाने तिरुपती विहारकडून विजयनगर आणि अन्य वसाहतींकडे जाणारा हा मुख्य रस्ता आहे. त्यामुळे रोज हजारो लोक या रस्त्यावरून ये-जा करतात. दोन-तीन महिन्यांतच पावसाळा तोंडावर आहे. त्यामुळे एखादा जरी मोठा पाऊस पडला तरी हा संपूर्ण रस्ता चिखलमय होईल आणि इतर वसाहतींशी संपर्कच तुटेल, अशी भीती आहे.

वसाहतीतील मूळ सिमेंट रस्त्याची अशी अवस्था करून टाकली आहे. त्यावरील मोठमोठे दगडगोटे पाहून यावरून साधे चालणेही किती कठीण आहे हे स्पष्ट होते. ज्येष्ठांना तर त्यावरून चालताना कसा त्रास होतो त्याचा हा पुरावा.

काय म्हणतात ठेकेदार
यामोरेश्वर सोसायटीच्या पाठीमागे स्ट्रॉमवॉटर नाला आहे. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठीच तो असल्याने त्यात गटाराची पाइपलाइन टाकली जाऊ शकत नाही. आमच्या प्रोव्हिजनमध्ये केवळ डांबरीकरण आणि गट्टू बसवणे एवढेच आहे. त्यामुळे आम्ही ते काम करून देण्यास तयार आहोत पण लोकांची काँक्रीट रस्त्याची मागणी आहे. यासाठीच ते काम मागे पडले. शिवाय अजून काम अर्धवट आहे. ते करण्यासाठी रस्ता उकरावाच लागेल. त्यामुळे हे सर्व काम पूर्ण झाल्यावरच हा सर्व रस्ता दुरुस्त करून देणार आहोत. शिवाजीपंडित, खिल्लारीइन्फ्रास्ट्रक्चर
बातम्या आणखी आहेत...