आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थिनींची छेड काढणा-या कंपनी व्यवस्थापकास जमावाने बदडले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - महिनाभरापासून कधी महिलेच्या वेशात, तर कधी सुटाबुटात येऊन शालेय विद्यार्थिनींची छेड काढणा-या कंपनी व्यवस्थापकाची जमावाने धुलाई केली. त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. हा व्यवस्थापक महिलांची अंतर्वस्त्रे परिधान करीत असल्याचे उघड झाले. एका अल्पवयीन विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून त्याच्यावर वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात बाल लैंगिक शोषण प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभय कुलकर्णी असे त्याचे नाव असून तो वाळूजमधील एका नामांकित कंपनीत व्यवस्थापक आहे. गंगापूर तालुक्यातील सिंदीसिरजगाव येथे सातवीनंतर शिक्षणाची सोय नसल्याने पुढील शिक्षणासाठी येथील जवळपास 25 विद्यार्थिनी सकाळी साडेआठच्या सुमारास चार किलोमीटर पायी चालून पोळ रांजणगाव येथील सोसायटी हायस्कूलमध्ये जातात. याच वेळेत अभय कुलकर्णी दर शनिवारी व मंगळवारी महिंद्रा लोगान कारने (एमएच 04 डीएन 1229) नवीन मुंबई महामार्गावर नाशिककडून औरंगाबादकडे येत महिनाभरापासून विद्यार्थिनींची छेड काढत होता. त्यामुळे विद्यार्थिनींनी ही बाब पालकांच्या कानावर टाकली.

स्त्रीलंपटपणा व शृंगार
कुलकर्णीच्या कारमध्ये विविध प्रकारची महागडी सौंदर्य प्रसाधने, महिलांचे कपडे, अंतर्वस्त्रे, स्प्रे, सुगंधी तेल आढळून आले. तो वाळूजला द्वारकानगरीत राहतो. नाशिकहून परतताना विद्यार्थिनींना कारमध्ये बसण्याची गळ घालायचा. त्यांनी नकार दिला तर त्यांची छेड काढायचा. तो कधी नाकात नथ घालायचा, लिपस्टिक व काजळ लावायचा, दागिन्यांसह महिलांचा पेहराव करायचा.

महिलांची अंतर्वस्त्रे परिधान केली
कुलकर्णीला पोळ रांजणगावातील शाळेत आणले असता विद्यार्थिनींनी त्याला ओळखले. त्यानंतर पालकांनी त्याला बेदम चोप दिला. मारहाणीत त्याच्या शर्टची बटणे तुटली असता त्याने महिलांची अंतर्वस्त्रे परिधान करून त्यावर शर्ट घातल्याचे उघड झाले.

ही सायकोसेक्स्युअल डिसऑर्डर
- लैंगिक शोषणाचा प्रयत्न करणे हा ‘सायकोसेक्स्युअल डिसऑर्डर’चा प्रकार आहे. तर विरुद्ध लिंगाच्या व्यक्तीप्रमाणे पेहराव करणे, त्यासारखे वागणे हा एक आजार असून त्याला ‘ट्रान्सवेस्टिझम’ असे संबोधले जाते. कोणत्याही प्रकारे लैंगिक छळ करणे हा गुन्हाच आहे.
डॉ. संजीव सावजी, मानसोपचारतज्ज्ञ

फोटो - अल्पवयीन विद्यार्थिनींची छेड काढणा-या अभय कुलकर्णी यास जमावाने बेदम चोप दिला. दुस-या छायाचित्रात कुलकर्णीच्या बंद पडलेल्या कारची पाहणी करताना नागरिक. छाया : दिव्य मराठी