आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 'Road Romio Women Beat Marshal Of Persistent Now

‘रोड रोमिओं’च्या मागावर आता महिला बीट मार्शल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद-सडक सख्याहरींच्या उचापतींना चाप लावण्यासाठी ‘दामिनी’च्या मदतीला महिला बीट मार्शल धावल्या आहेत. महिलांची छेडछाड रोखण्याचा त्यांचा इरादा आहे. पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास हिरवा झेंडा दाखवून बीट मार्शलला गस्तीसाठी रवाना केले. महिलांच्या संरक्षणासाठी ‘दामिनी’ मोबाइल व्हॅन गल्लीबोळात जाऊ शकत नाही. त्यावर उपाय म्हणून बाइकस्वार महिला बीट मार्शल तैनात करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गल्लीबोळाचा आडोसा शोधणार्‍या रोड रोमिओंची आता काही खैर नाही.कॉलेजसह सिनेमागृहात करडी नजर! : चौक, शाळा, महाविद्यालय, चित्रपटगृह, बसस्थानक, मॉल आदी गर्दीच्या ठिकाणी महिलांची छेडछाड होते. ती टाळता यावी यासाठी 15 दिवसांपूर्वी पोलिस आयुक्तालयाने दामिनी पथकाची स्थापना केली. परंतु अरुंद गल्ल्यांमध्ये दामिनी पथकाचे वाहन पोहोचू शकत नाही. अशा ठिकाणी बाइकस्वार महिला बीट मार्शल जातील. या मार्शलना वॉकी टॉकी संच तसेच जीपीएस सिस्टिमने जोडण्यात आले आहे. पोलिस नियंत्रण कक्षाकडून आलेल्या माहितीच्या आधारे बीट मार्शल महिलांच्या मदतीला धावून जातील. पोलिस आयुक्तालयात झालेल्या उद्घाटनप्रसंगी उपायुक्त डॉ. जय जाधव, सोमनाथ घार्गे, सहायक पोलिस आयुक्त केशव पातोंड, पोलिस निरीक्षक रामेश्वर थोरात, मोटार परिवहन निरीक्षक युवराजसिंग ठाकूर आणि राखीव निरीक्षक प्रकाश पाठक उपस्थित होते.

प्रशिक्षणानंतर पुन्हा वाढ : सध्या चार महिला बीट मार्शल शहरात गस्त घालणार आहेत. तर प्रशिक्षणानंतर आणखी बीट मार्शल वाढविण्यात येतील. त्याचप्रमाणे महिला बीट मार्शलना सोयीस्कर वाहन (मोपेड) देण्यासंदर्भात पोलिस आयुक्त संजय कुमार पोलिस महासंचालक कार्यालयाशी पत्र व्यवहार करणार आहेत.

असभ्य वर्तन करणार्‍यांवर कारवाई : मकबरा परिसरात पुण्यातील जोडपे असभ्य वर्तन करत असल्याची माहिती नागरिकांनी सायंकाळी पोलिस नियंत्रण कक्षाला दिली. दामिनीशी संपर्क साधून याची माहिती देण्यात आली. दामिनी पथकासह उपनिरीक्षक सुनीता मिसाळ यांनी धाव घेत या जोडप्याला पकडले. त्यांना बेगमपुरा पोलिस ठाण्यात नेत शांतता भंग आणि असभ्य वर्तन केल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर त्यांना सोडण्यात आले. न्यायालयाच्या आदेशाने त्यांना प्रत्येकी पाचशे ते एक हजार रुपये दंड आकारला जाऊ शकतो.

चार मार्शल तैनात

बीट मार्शल पथकात नव्याने भरती झालेल्या ताज्या दमाच्या चार महिला पोलिस शिपायांचा समावेश आहे. आम्रपाली अंभोरे, नुसरत खान, संगीता बडगुजर, सरला नरवडे यांच्यावर नवी जबाबदारी देण्यात आली आहे. पुढील आठवड्यात आणखी दोघींची नियुक्ती करण्यात येणार आहे. पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी हस्तांदोलन करीत चौघींनाही चमकदार कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या.
बीट मार्शलला ‘पल्सर’ द्या!

महिला बीट मार्शलला हिरवा झेंडा दाखवण्यापूर्वी पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी महिलांचे वाहन परवाने तपासले. नव्या उपक्रमाचे उद्घाटन केले. त्यानंतर कर्तव्यावर रवाना होण्याच्या सूचना संजयकुमार यांनी दिल्या. दुचाकीला किक मारताना बीट मार्शलची अक्षरश: दमछाक झाली. हे पाहून पोलिस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांना उद्देशून आयुक्त म्हणाले, ही भंगार दुचाकी बदलून त्यांना पल्सर दुचाकी द्या.