आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रस्ते कामात -20 काेटींचा भ्रष्टाचार; कामे न करताच बिले उचलली, चाैकशीचे अादेश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांकेकते फोटो - Divya Marathi
सांकेकते फोटो

करमाड- सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत कंत्राटदारांनी कामे न करताच सुमारे २० काेटी रुपयांची बिले उचलल्याचा प्रकार अाैरंगाबाद जिल्ह्यात उघडकीस अाला अाहे. या प्रकरणाची थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत  तक्रार गेल्यानंतर त्यांच्या अादेशानुसार बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी  दक्षता आणि गुणनियंत्रण मंडळाला चाैकशीचे अादेश दिले अाहेेत. विशेष म्हणजे, रस्ते कामाचा खर्च तीन लाखांच्या वर गेल्यास बांधकाम खात्याला टेंडर काढावे लागते. मात्र ही प्रक्रिया टाळण्यासाठी तीन लाखांच्या अातील कामे काढून ती मर्जीतील ठेकेदारांना देऊन पैसे उकळण्यात अाल्याचे उघडकीस अाले अाहे.  


सन २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी जिल्हा नियोजन मंडळाने औरंगाबाद, सिल्लोड व पैठण तालुक्यातील ग्रामीण भागातील १००  रस्त्यांसाठी २० कोटी ५५ लाख १४ हजार ४५३ रुपयांचा निधी मंजूर केला हाेता. यात पैठण तालुक्यातील दोन रस्ते तीन लाख रुपये खर्चाच्या आतील असून १७ रस्ते तीन लाख ते १४ लाख रुपये खर्चापर्यंत आहेत. विशेष म्हणजे पैठण तालुक्यातील एकतुनी ते पिंप्री, घारेगाव, अंबड ते कौडगाव हा रस्ताच नाही, तरीही या कामावर अनुक्रमे २ लाख ९९ हजार ७७५ रुपये व २ लाख ९९ हजार ९०४ रुपयांची विनाटेंडर कामे काढून ती न करताच बिले वाटप करण्यात अाली. औरंगाबाद तालुक्यात नियोजन मंडळाने ‘रस्त्याचे बांधकाम’ या नावाखाली ७० कामांना मंजुरी दिली. ही सर्व कामे २ लाख ९९ हजार रुपये खर्चाच्या आतील आहेत.  विशेष म्हणजे ही कामे केवळ कागदाेपत्री करून पैसे उचलण्यात अाले. मात्र या गैरव्यवहाराच्या तक्रारी थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत गेल्यामुळे अाता या प्रकरणांची चाैकशी लावण्यात अाली.   


अाैरंगाबाद तालुक्यातील ७०, सिल्लाेड १०, पैठण तालुक्यातील दोन कामांचा या गैरव्यवहारात समावेश आहे. यापैकी केवळ जडगाव नं. दाेन फाटा ते एकलहेरा, कोनेवाडी ते जळगाव फेरण अशा मोजक्या रस्त्यांवर मुरूम टाकण्यात आला. औरंगाबाद तालुक्यातील शेंद्रा कमंगर ते टाकळी, टाकळी ते टाकळी वैद्य, टोणगाव ते भालगाव, एकलहेरा, गोलटगाव (नुसती एकेरी नावे), कौडगाव ते लालवाडी (हा रस्ताच वापरात नाही तरी अठरा लाखांची कामे मंजूर), गणेशपूर ते जळगाव फेरण पाच वेळा, कोनेवाडी ते जळगाव फेरण पाच वेळा, दरेगाव ते गणेशपूर पाच वेळा, जळगाव फेरण ते शेवगा चौफली असे पाच पाच वेळा रस्ते दर्शवून एका रस्त्यावर २ लाख ९९ हजार रुपयांपर्यंत बिले उचलण्यात आलेली आहेत.    


जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार  
आडगाव ते डायगव्हाण, डायगव्हाण ते घारेगाव, एकलहेरा ते गोलटगाव, घारेगाव एकतुनी ते टाकळीमाळी, घारेगाव ते कोळघर, एकतुनी ते घारेगाव, पिंप्री, अंबड ते कौडगाव या रस्त्यांचे बांधकाम न करताच कंत्राटदाराने बिले उचलून घेतली. संबंधित कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यावर कारवाई करून रक्कम वसूल करून घ्यावी, अशी मागणी अधीक्षक अभियंता तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे केली असल्याचे पिंप्रीराजा येथील जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चांगुलपाये  यांनी सांगितले.

 

दाेषींवर कारवाई हाेणारच   
विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी या गैरव्यवहाराची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांना दिली हाेती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्र्यांना चाैकशी करण्याचे अादेश दिले होते. अर्थमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांना पत्र पाठवून याप्रकरणी चाैकशी करण्याचे अादेश दिले असून, दाेषींिवरुद्ध कठाेर कारवाई करण्यात येईल.    
- अतुल चव्हाण, अधीक्षक अभियंता, बांधकाम विभाग.

बातम्या आणखी आहेत...