आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयडियल रस्ते? धूळ, दगड, दुर्दशा...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मनपा आयुक्तांनी शहरातील रस्ते आयडियल करणार, असे म्हटले होते. मात्र, एकीकडे रस्त्याचे काम अर्धवट ठेवल्याने धूळ आणि एक रस्ता दुरुस्त केला तर दुसरा उखडला, तर दुसरीकडे रस्ता दिसतच नाही, अशी दयनीय अवस्था झाली आहे. सेव्हन हिल्सकडून गारखेड्याकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम अर्धवट ठेवल्याने वाहनचालक नागरिकांना दररोज धुळीचा सामना करावा लागतो. तसेच सिडकोतील हॉटेल सनी ते ओंकार गॅस या मार्गावर एकीकडे दुरुस्ती केली जात आहे, तर वर्षभरापूर्वी दुरुस्त केलेला रस्ता उखडला आहे. पिसादेवीकडे जाणारा रस्ता तर दिसतच नाही. वाहनचालकांना रस्त्यावरील दगड-गिट्टीचा रोज सामना करावा लागतो.
सिडको एन -७ येथील हॉटेल सनी ते आेंकार गॅसपर्यंतच्या १५ मीटर व्हाइट टॉपिंग रस्त्याचे वर्षभरातच पितळ उघडे पडल्याचा पर्दाफाश ‘डीबी स्टार’ने करताच ठेकेदाराने रस्त्याच्या मधोमध सरफेस उखडून वर आलेली गिट्टी आणि खड्डे बुजवत खाबुगिरीचे पुरावे नष्ट करण्याचे काम सुरू केले. मात्र, ही मलमपट्टी करताना दुसऱ्या बाजूने पुन्हा खाबुगिरी उघड झाली आहे. वर्षभरापूर्वी तयार केलेल्या या रस्त्यावर जागोजागी गिट्टी वर येऊ खड्डे पडले आहेत. मनपा आयुक्तांनी स्वत: याकडे लक्ष देऊन संबंधितांवर कारवाई करण्याची गरज आहे.

सिडकोतील या रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती. त्यानंतर शहर एकात्मिक रस्ते विकास योजनेअंतर्गत १५ मीटर रुंदी आणि ५०० मीटर लांबी असलेल्या या रस्त्याच्या मजबूतीकरण आणि काँक्रीट कामासाठी सव्वा कोटी रुपयांचा प्रस्ताव २० जानेवारी २०१५ रोजी सर्वसाधारण सभेत महापौरांनी मंजूर केला. त्यानुसार कोटी १३ लाख हजार रुपयाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. त्याला स्थायी समितीने फेब्रुवारी २०१५ रोजी मंजुरी दिली. कार्यारंभ अादेशही काढण्यात आला. मात्र, जुन्या डांबरी रस्त्याचे खोदकाम, खडीकरण मजबुतीकरण, दबाई आणि क्युरिंग नीट केल्यामुळे रस्ता उखडल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला.

याबाबत नागरिकांनी अनेकवेळा तक्रारीही केल्या, पण कुणीही दखल घेत नव्हते. दरम्यान ‘डीबी स्टार’ने २९ जानेवारी २०१६ रोजी ‘अशीच माती होईल’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्यांनतर अधिकारी आणि ठेकेदारांनी दोष लोकांचाच म्हणत रस्ता दुरूस्तीचे काम सुरू केले. मात्र, रस्त्याची दुरुस्ती करत असतानाच शेजारच्या जुन्या रस्त्यावरील गिट्टी उखडल्याचे समोर आले आहे.
मध्यमवर्गीय नोकरदारांची वसाहत म्हणून उदयास येत असलेल्या पिसादेवीकडे जाणाऱ्या नागरिकांना खराब रस्त्याचा सामना करावा लागत आहे. नारेगावमार्गे पिसादेवीकडे जाणारा तीन किलोमीटर लांबीच्या रस्त्याची अक्षरश: चाळणी झाली आहे. जाण्यासाठी वेळ तर लागतोच आहे, शिवाय दगडांवरून गाडी स्लीप होऊन अपघातही होत आहेत.

नारेगावमध्ये निवासी वसाहती मोठ्या प्रमाणात होत आहेत. अनेक नोकरदार या भागामध्ये राहतात. ज्यांना जालना रोडला यायचे अाहे, असे लोक नारेगावमार्गे येणाऱ्या रस्त्याचा वापर करतात. नारेगावपासून पिसादेवीचे अंतरही कमी आहे. मात्र, रस्ता अत्यंत खराब झाले आहे. पूर्वीचे डांबरीकरण उखडून मोठ्या खडीचा लेअर उघडा झालेला आहे. यामुळे वाहने व्यवस्थित चालवता येत नाहीत. या रस्त्यावर आठवड्यातून किमान एक तरी दुचाकीस्वार घसरून पडतो. पिसादेवीला जाण्यासाठी जळगाव रोडवरील अांबेडकर चौकातूनही रस्ता आहे. मात्र, जालना रोडकडे येणाऱ्यांसाठी हे अंतर अधिकचे आहे. नारेगावकडून शॉर्टकर्ट असलेल्या रस्त्याची रुंदीही अधिक अाहे. मात्र, केवळ खराब असल्याने नागरिक त्याचा वापर करू शकत नाहीत.
सेव्हनहिल्स ते गजानन मंदिर चौकमार्गे रिलायन्स मॉल आणि पुंडलिकनगर ते गजानन मंदिर चौक या व्हाइट टाॅपिंग रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. खडी, खड्डे आणि धुळीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. दरम्यान ‘डीबी स्टारने’ याबाबत वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी अधिकाऱ्यांसह पाहणी केली. त्यानंतर माती परीक्षण करण्याचा निर्णय घेण्यात येऊन पुढील काँक्रीटचा बेस आणि अन्य तांत्रिक बाबी तपासूनच हे काम केले जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले होते. यासाठी खास पुण्याच्या तज्ज्ञांची नियुक्ती केली होती. मात्र, महिना उलटूनही ना पुण्याच्या तज्ज्ञांनी पाहणी केली, ना माती परीक्षण केले.

सेव्हनहिल्स ते सूतगिरणी चौक या १९२० मीटर लांबीच्या रस्त्याच्या व्हाइट टॉपिंगसाठी कोटी ४० लाख हजार ९४८ रुपये आणि गजानन महाराज मंदिर चौक ते जयभवानी चौक रस्त्याच्या १८५० मीटर लांबीसाठी कोटी ४३ लाख हजार ३१९ रुपये शासकीय निधीतून मंजूर करण्यात आले होते. या दोन्ही कामांचा ठेका जीएनआय इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला देण्यात आला होता. महिन्यांत काम पूर्ण करण्याची मुदत होती. मात्र, दोन वर्षे उलटूनही अद्याप रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. जयभवानी चौक ते पुंडलिकनगरपर्यंतचे काम ठेकेदाराने पूर्ण केले. मात्र, पुंडलिकनगर ते गजानन मंदिर चौक रस्त्याच्या एका बाजूचे काम अर्धवट ठेवले. दुसरीकडे सेव्हन हिल्स ते गजानन मंदिर चौक आणि पुढे रिलायन्स मॉलपर्यंत एका बाजूने रस्त्याचे काम अर्धवट ठेवण्यात आले. परिणामी गेल्या वर्षभरापासून नागरिकांना या मार्गाने जाताना धूळ आणि खडीचा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान ठेकेदाराने काम झाल्यानंतर त्यावर खडी, मुरूम पसरवला, पण डांबरीकरण केले नाही. याच कामावर काँक्रिटीकरण केले तर रस्ता खचण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे कारण पुढे करत ठेकेदाराने काम बंद केले. परिणामी या रस्त्याचे काम रखडले.

‘डीबी स्टार’च्या वृत्तानंतर ठेकेदाराला शोल्डरमध्ये नव्याच्या जागी जुने पेव्हरब्लॉक बसवता आले नाही. तर रखडलेल्या अॅप्रोच रस्त्याचे कामही याच ठेकेदाराने केले. आता निकृष्ट कामाची दुरुस्ती होत आहे, पण दुसऱ्या बाजूने पुन्हा सरफेस उखडायला सुरुवात झाली आहे. या रस्त्याची तांत्रिक सल्लागाराकडून तपासणी होणे गरजेचे आहे. नारायणराव श्रीखंडे

लोकांनी ओरड केल्यानंतर धुळीचा त्रास कमी करण्यासाठी रस्त्यावर दिवसातून तीनवेळा पाण्याचा सडा मारला जातो. मात्र, पाणी सुकल्यानंतर पुन्हा धुळीचा त्रास सुरू होतो. धुळीचा सामना संपता संपेना झाला आहे. लहान मुलांच्या आरोग्यावर याचा परिणाम होत आहे. विश्वनाथ जांभळे

(मनपाचे शाखा अभियंता एस. एस. पाटील, उपअभियंता बी. के. परदेशी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.)
‘डीबी स्टार’च्यावृत्तानुसार आम्ही रस्त्याची दुरुस्ती केली आहे. आणखी कुठे दोष असतील तर आम्ही तेदेखील दूर करू. आता रस्ता चांगला झाला आहे. जोपर्यंत रस्ता पूर्णपणे दुरुस्त होणार नाही, तोपर्यंत आम्ही ठेकेदाराला एक रुपयाही देणार नाही. एस.एम. जाधव, उपअभियंता,मनपा
भूमिगत गटारयोजनेतून पाइप टाकण्यासाठी खोदकाम केल्याने हे काम अर्धवट राहिले होते. त्यानंतर आम्हीच खोदलेल्या रस्त्याचे मजबुतीकरण करून काँक्रीटचे काम सुरू केले होते. मात्र, तांत्रिक सल्ला घेऊनच काम सुरू करावे असे म्हणत मनपाने काम थांबवले. पुण्याच्या एजन्सीने पाहणी केली, पण अद्याप स्ट्रक्चर डिझाइन आलेले नाही. अखिलेश कुमार, सहायक अभियंता, जीएनआय इन्फ्रास्ट्रक्चर

‘डीबी स्टार’मध्ये वृत्त आल्यानंतर तत्कालीन मनपा आयुक्त केंद्रेकरांनी हे काम करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून त्याच्या बिलांना कात्री लावण्याचे आदेश दिले होते. मात्र, याच ठेकेदाराकडून निकृष्ट कामाची दुरुस्ती केली जात आहे. अधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या आदेशाविरुद्ध काम का केले याची तपासणी होणे गरजेचे आहे. श्रीकृष्ण टकले

मुख्य बाजारपेठेचा आणि त्याला लागूनच वसाहती असलेला हा मुख्य रस्ता आहे. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत रस्ता लोकांच्या गर्दीने गजबजलेला असतो. धुळीमुळे प्रदूषणातही वाढ झाली आहे. रस्त्याचे काम असेच रखडले तर लोकांना श्वसनाचे आजार उद्भवण्याची शक्यता आहे. रामचंद्र पवार

हा रस्ता प्रचंड खराब झाला आहे. विशेषत: महिला आणि वृद्धांना या रस्त्यावरून जाताना खूप त्रास होतो. विधानसभा अध्यक्षांच्या मतदारसंघातील रस्त्याची ही दुरवस्था आहे. त्यांच्याकडे आम्ही रस्ता दुरुस्तीसाठी वेळोवेळी मागणी करत आहोत. ईश्वर जाधव

जालना रस्त्याकडे जाणाऱ्या प्रत्येकासाठी हाच रस्ता जवळचा अाहे. मात्र, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघात होतात, वाहनांचेही नुकसान होते. हा रस्ता ग्रामीण असल्याने जिल्हा परिषदेकडे येतो. जि. प.ने तत्काळ दुरुस्ती करावी. सुरेश जोशी
बातम्या आणखी आहेत...