आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांच्या ‘तारखे’साठी थांबवले पाच रस्त्यांचे काम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - राज्यात सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार अतुल सावे यांच्या मागणीवरून शहरातील रस्त्यांसाठी २५ कोटी रुपये दिले. रीतसर निविदा प्रक्रिया होऊन दहा दिवसांपूर्वीच पालिकेने ठेकेदाराच्या हाती कार्यादेश दिला. मात्र, ज्यांनी निधी दिला त्यांच्याच हस्ते कामाचा श्रीगणेशा व्हावा यासाठी भाजपचे स्थानिक पदाधिकारी अडून बसले. परिणामी गेल्या दहा दिवसांपासून पालिका अधिकारी ठेकेदार मुख्यमंत्री कधी शहरात येतात, याकडे डोळे लावून बसले आहेत.

मुख्यमंत्री १७ सप्टेंबरला शहरात आले होते. तेव्हाच शुभारंभ करता यावा म्हणून प्रशासनाने १२ सप्टेंबरलाच ठेकेदाराला कार्यादेश दिला होता; परंतु तेव्हा फडणवीस यांना वेळ नव्हता. त्यामुळे तेव्हा कामाचा शुभारंभ होऊ शकला नाही. आता भाजपचे पदाधिकारी मुख्यमंत्र्यांकडे ‘तारीख’ मागत आहेत. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मंत्रिमंडळ बैठकीसाठी ते शहरात येतील, तेव्हाच कामाचे भूमिपूजन शक्य आहे. त्यामुळे कार्यादेश हाती पडल्यानंतर २५ दिवस फक्त मुख्यमंत्र्यांच्या प्रतीक्षेत जाणार आहेत.

पाचपैकी काही रस्त्यांची कामे सुरू करण्यात यावीत अन् एक रस्ता भूमिपूजनासाठी ठेवावा, असा अधिकारी तसेच ठेकेदाराचा आग्रह आहे; परंतु त्यास भाजपचे पदाधिकारी अजिबात राजी नाहीत. मुख्यमंत्री आल्यानंतरच काम सुरू करा, अन्यथा भूमिपूजनाला काहीही अर्थ राहणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.
हे आहेत शहरातील पाच रस्ते
1.कामगार चौक ते महालक्ष्मी चौक
2.बाबा पेट्रोल पंप ते क्रांती चौक
3.सेव्हन हिल्स ते सूतगिरणी
4.कासलीवाल कॉर्नर ते तुकोबानगर
5.गजानन मंदिर ते जयभवानीनगर

आतापर्यंत खोदकाम झाले असते : दिलीप थोरात
मे.जी.एन.आय. इन्फ्रास्ट्रक्चर ठेकेदार कंपनीने कामाची जोरदार तयारी करून ठेवली आहे. हातात कार्यादेशही आहे; परंतु तोंडी सांगण्यानुसार ते थांबले आहेत. आदेश हाती पडताच त्यांनी काम सुरू केले असते, तर आतापर्यंत रस्त्याची एक बाजू खोदूनही झाली असती. मात्र, भाजप राजी होत नाही. काम सुरू होण्यास पंधरा दिवस लागू शकतात, असे सभापती दिलीप थोरात यांनी म्हटले आहे.