आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यांच्या कामांना लागणार नऊ महिने

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद-पहिल्या टप्प्यातील दहा रस्त्यांची कामे फेब्रुवारीत सुरू होणार असली तरी हे सर्व रस्ते पूर्ण व्हायला किमान नऊ महिने लागणार आहेत. पहिल्या टप्प्यातील व्हाइट टॉपिंगच्या दहा रस्त्यांच्या कामांना स्थायी समितीची मंजुरी मिळवताना शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी ही माहिती दिली. याशिवाय दुसर्‍या टप्प्यातील कामांना आणखी वेळ लागेल.
स्थायी समितीच्या आज झालेल्या बैठकीत प्रशासनाच्या वतीने या रस्त्यांबाबत प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यावरील चर्चेत बोलताना समीर राजूरकर, विकास जैन, सुरेंद्र कुलकर्णी यांनी व्हाइट टॉपिंगसंदर्भात विविध प्रश्न विचारले. ठेकेदाराला कामासाठी किती कालावधी दिला आहे? त्या कालावधीत त्याने काम पूर्ण न केल्यास काय कारवाई करणार? या कामांवर देखरेख करण्यासाठी प्रकल्प सल्लागार समिती नेमली आहे का? रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ठेकेदारावर का नाही? असे प्रश्न या सदस्यांनी केले. ठेकेदाराकडून 5 टक्क्यांऐवजी 10 टक्के डिपॉझिट घेण्याची सूचनाही त्यांनी केली.
त्यावर बोलताना पानझडे म्हणाले, रस्त्यांची सध्या जी रुंदी आहे तेवढेच रस्त्यांचे व्हाइट टॉपिंग केले जाणार आहे. या शिवाय काँक्रिटचे टॉपिंग सतत खोदले जाऊ नये यासाठी दर 50 मीटरवर रोड क्रॉसिंग पाइप टाकले जाणार आहे. पुढे ते म्हणाले, दहा रस्ते नऊ महिन्यांत पूर्ण होतील. पावसाळ्य़ातही काम सुरू राहील. एकाच ठेकेदाराकडे काम असल्याने आधी अतिशय वाईट अवस्था असलेल्याच रस्त्यांची कामे केली जातील. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर रस्ते होतील. या कामाला विलंब झाला नियमानुसार कारवाई केली जाईल असेही पानझडे यांनी सांगितले. त्यांच्या उत्तरावरून दहा रस्ते चांगले व्हायला किमान सप्टेंबर-ऑक्टोबर उजाडणार आहे. शिवाय पावसाळ्य़ात अतिशय मंदगतीने काम होणार आहे हे स्पष्ट झाले. या कामावर प्रकल्प सल्लागार समिती म्हणून पुण्याच्या क्रिएशन्स या कंपनीची नियुक्ती केल्याचेही ते म्हणाले. दहा रस्त्यांची अंदाजपत्रक रक्कम 18 कोटी 72 लाख 29 हजार 661 रु. असून या कामासाठी जेपी एंटरप्रायजेस, डीके इन्फ्रास्ट्रक्चर आणि जतीन एंटरप्रायजेस यांनी निविदा भरल्या होत्या. जेपीने 9.99 टक्के, डीकेने साडेबारा टक्के, तर जतीनने 13.60 टक्के जादा दराने निविदा भरल्या होत्या. त्यातील पुण्याच्या जेपीची निविदा निवडण्यात आली. चर्चा करून साडेसात टक्के अधिक दराने काम करण्याची ठेकेदाराने तयारी दर्शवली.
असे आहेत रस्ते
उद्धवराव पाटील चौक ते सिद्धार्थनगर चौक ते टीव्ही सेंटर, मध्यवर्ती जकात नाका ते जळगाव रोड, एसएससी बोर्ड ते पीरबाजार, मल्हार चौक ते जवाहरनगर पोलिस स्टेशन, हॉटेल एव्हन ते मुकुंदवाडी मंदिर, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक ते सतीश पेट्रोलपंप ते कोकणवाडी, तिरुमला मंगल कार्यालय ते विजय चौक, क्रांती चौक ते पैठण गेट, पोलिस मेस ते बळीराम पाटील हायस्कूल, लेमन ट्री ते हसरूल टी पॉइंट
कसे निवडणार वाईट रस्ते?
दहा रस्त्यांची कामे सुरू करताना सर्वात वाईट अवस्था असणारे रस्ते आधी केले जातील असे शहर अभियंता म्हणाले असले तरी तेच काम सर्वात अवघड आहे. कारण या यादीत कमी वाईट दर्जाचा एकही रस्ता नाही. सर्वच रस्त्यांचे वाटोळे झाल्याने रस्ते निवडतानाही वादावादी होणे अटळ असल्याचेच दिसते.
पहिल्या टप्प्यातील दहा रस्त्यांची कामे फेब्रुवारीत होणार