आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांच्या घामाची कमाई लुटणारे ४८ तासांत गजाआड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - कापूस व्यापाऱ्याची ११ लाख ७२ हजार रुपये असलेली बॅग हिसकावून पसार झालेल्या चोरट्यांना गुन्हे शाखेच्या पथकाने दोनच दिवसांत गजाआड केली. जालना रोडवर हॉटेल रामा इंटरनॅशनलसमोर चोरट्यांनी ही बॅग हिसकावली होती. या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. सय्यद फरीद सय्यद सलीम, सय्यद जुनेद सय्यद शौकत, सय्यद रफत सय्यद याकूब, तय्यब खान यासीम खान (सर्व रा. मोंढा नाका परिसर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

सोमवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास देवराव भाऊराव पुंड (रा. कवडगाव) आणि शेख रियाज शेख वझी यांनी एका व्यापाऱ्याकडून हवालामार्फत आलेले कापसाचे ११ लाख ७२ हजार रुपये घेतले. हे पैसे शेतकऱ्यांना देण्यासाठी ते गावाकडे जात होते. रामा हॉटेलसमोरील गतिरोधकावर त्यांनी दुचाकीची गती कमी केल्याचा फायदा घेत दुचाकीवरून दोघांनी पैशांची बॅग हिसकावून पळ काढला. या घटनेनंतर पुंड आणि रियाज रडकुंडी आले होते. गुजरात येथे शेतकऱ्यांनी विकलेल्या कापसाचे हे पैसे होते.

सीसीटीव्हीमुळे सापडले आरोपी : घटनेची माहिती मिळताच सिग्नलवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज सायबर शाखेने तपासले. त्यात महत्त्वाचा पुरावा मिळताच तपासाची चक्रे फिरली. चोरट्यांच्या टोळीतील एकाला मोंढा नाका परिसरातून तर तीन जणांना पुण्यातून ताब्यात घेण्यात आले. एक आरोपी फरार आहे. सायबरचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल खटावकर यांनी दोन रात्री जागून तपास केला. त्यांना उपनिरीक्षक नितीन आंधळे सायबरच्या पथकाने सहकार्य केले. या दोन्ही अधिकाऱ्यांना प्रत्येकी २५ हजारांचे पथकास ५० हजार रुपये बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

यांनी बजावली कामगिरी :
उन्मेष थिटे, गजानन कल्याणकर, प्रशांत आवारे, अनिल वाघ, वासुदेव राजपूत, डी. डी. खरे, विवेक औटी, रेवणनाथ गवळे, प्रदीप कुटे, गणेश वैराळकर, सुशांत शेळके, धनंजय सानप, सुदर्शन एखंडे, ज्योती भोरे, कल्पना जांभोटकर, विशाल सोनवणे, रवी दाभाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

टिप देणारा कोण? : शहरात बॅग लिफ्टिंगच्या घटना वाढल्या आहेत. यात गुलमंडी, समर्थनगर, शिवछत्रपती महाविद्यालयाजवळील चौक, शिवाजी हायस्कूल रस्ता, जवाहरनगर परिसरातील घटनांचा समावेश आहे. या घटनांत या टोळीचा समावेश आहे का, याचा तपास पोलिस करत आहेत. पुंड हे पैसे घेऊन जात असल्याची टिप मिळाल्यानेच त्यांनी बॅग हिसकावली, असा पोलिसांचा निष्कर्ष आहे.
बातम्या आणखी आहेत...