आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्मार्ट युगात चोरांची पसंती लॅपटॉप, मोबाइलला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - काळ बदलला. स्मार्ट युग आले. माणसे बदलली. तंत्र बदलले. मग चोर तरी कसे मागे राहतील? एरवी दागदागिने आणि सोने-नाणे यावर हात मारणाऱ्या चोरांना नव्या स्मार्ट वस्तूंनी चांगलीच भुरळ घातली.

राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड विभागाचा (एनसीआरबी) २०१५ चा अहवाल बघितल्यास चोरांची ही स्मार्ट शैली लक्षात येते. यानुसार देशभरातून वर्षभरात चोरांनी थोडेथोडके नव्हे तर ४६,८७३ मोबाइल, तर ११,७४५ लॅपटॉप लांबवले. याचे मूल्य आहे १३३३ कोटी ६५ लाख रुपये!
तज्ज्ञांच्या मते, उपलब्धता व विक्री शक्य असल्यामुळे चोरांची नजर अशा इलेक्ट्रिक उपकरणांवरच आहे. विशेष म्हणजे, चोरांनी या वस्तू चोरण्यासाठी भन्नाट क्लृप्त्या लढवल्या आहेत. धावत्या रेल्वेच्या दारात बसून प्रवास करणाऱ्यांच्या हातांना हिसका देऊन मोबाइल घेऊन पळ काढणे, डिलिव्हरीसाठी आलेल्या वस्तू आधीच लंपास करणे, दुरुस्तीसाठी आलेले लॅपटॉप, मोबाइल परस्पर विकून टाकणे, अशा अनेक प्रकारांचा यात समावेश आहे.

४७ हजार मोबाइलवर डल्ला
एनसीआरबीच्या अहवालानुसार, २०१५ मध्ये देशभरातून चोरीस गेलेल्या ४६,८७३ मोबाइलची किंमत ७२४ कोटी ८१ लाख रुपये आहे. यापैकी १५६ कोटी ७८ लाखांचीच वसुली होऊ शकली.
राज्याचे सेवानिवृत्त पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या मते, मोबाइल चोरीच्या प्रकरणात ग्राहकांची उदासीनताच जास्त कारणीभूत आहे. कारण, यात चोरीपेक्षा गहाळ झालेल्या मोबाइलचे प्रमाण अधिक आहे. गहाळ झाल्यानंतर वापरकर्ता त्याची चोरी झाली म्हणून तक्रार नोंदवतो. तर ज्याला मोबाइल सापडतो तोही परत करतोच असे घडत नाही.
लॅपटॉप चोरीचा हायटेक फंडा : २०१५ मध्ये लॅपटॉप चोरीच्या ११,७४५ घटना घडल्या. त्यामध्ये नव्या महागड्या तसेच जुन्या लॅपटाॅपचाही समावेश आहे. या वर्षी ३५४ कोटी १४ लाख रुपये किमतीचे लॅपटॉप चोरीला गेले, तर त्यातील फक्त १७.६ टक्केच चोरांकडून वसूल होऊ शकले. तज्ज्ञांच्या मते, लॅपटॉप चोरीच्या बहुतांश घटना घर व वसतिगृहातून झाल्या आहेत. लॅपटॉप चोरल्यानंतर तो अख्खा विकण्याच्या भानगडीत न पडता त्यातील भाग सुटे करून त्यांच्या विक्रीवर चोरांचा भर असतो.
१२१ सार्वजनिक बस पळवल्या
आतापर्यंत सोने, महागड्या वस्तू किंवा इलेक्ट्रीक उपकरणे चोरीच्या बाबतीत चोर आघाडीवर होते. मात्र, २०१५ मध्ये त्यांनी चक्क १२१ सार्वजनिक बसेसही पळवल्या आहेत. त्यापैकी फक्त ६६ बसेसच सुरक्षा यंत्रणा हस्तगत करू शकल्या आहेत. या बसेसची किंमत १०६ कोटी २१ लाखांच्या घरात आहे.
बातम्या आणखी आहेत...