आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यापार्‍याची कार फोडून 69 लाख चोरले; वर्षभरातील तिसरी घटना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- बीड बायपास रोडवरील प्लॉटच्या नोंदणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या व्यापार्‍याच्या कारची काच फोडून चोरट्याने बुधवारी (4 डिसेंबर) सायंकाळी 5.30 च्या सुमारास 69 लाख 10 हजार रुपये चोरून नेले. या घटनेमुळे रजिस्ट्री कार्यालयात खळबळ उडाली. याच परिसरात अशाच प्रकारे चोरी होण्याची वर्षभरातील ही तिसरी घटना आहे.
गारखेड्यातील लक्ष्मीकांत रामविलास धूत (53, रा. संदेशनगर) हे वाळूज औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांना सुट्या भागांचा पुरवठा करतात. बुलडाणा येथील महंमद सज्जाद शेख अब्दुल खलील यांना बीड बायपास रोडवरील 2 हजार 448 चौ. फुटांचा प्लॉट विकायचा होता. या प्लॉटच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार चार महिन्यांपूर्वी धूत यांनी अब्दुल शेख नईम (रा. धामणगाव) यांच्या मध्यस्थीने 97 लाख रुपयांत केला. प्लॉटची इसार पावती करताना धूत यांनी महंमद सज्जाद यांना 26 लाख रुपये दिले होते. इसार पावतीची मुदत संपत असल्याने धूत यांनी बुधवारी नोंदणी करण्याचे ठरवले. त्यानुसार त्यांनी आज महंमद सज्जाद यांना शहरात बोलावून घेतले. सकाळी 11 ते दुपारी 12 च्या दरम्यान धूत यांनी वाळूज येथील कोटक महिंद्रा बँकेतून 70 लाख रुपये काढले. हे पैसे त्यांनी नायलॉन बॅग आणि एअरबॅग अशा दोन वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये भरले. त्यानंतर या दोन्ही पिशव्या त्यांनी स्कोडा फॅबिया कार (एमएच 20 बीवाय 2932) मध्ये चालकाच्या डाव्या बाजूच्या सीटच्या खाली ठेवल्या. दुपारी एक ते दीडच्या सुमारास धूत हे कारने नोंदणी कार्यालयात आले. तेथील दलाल नासेर याला कागदपत्रे आणि अन्य कार्यालयीन कामासाठी त्यांनी बॅगमधील 90 हजार रुपये दिले. त्यानंतर उर्वरित 69 लाख 10 हजार रुपये कारमध्येच ठेवून ते निघून गेले. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास उर्वरित रोकड कारमध्ये ठेवून ते रजिस्ट्री कार्यालयात साक्षीदारांसह स्वाक्षरी करण्यासाठी गेले. तेथून परत येताच त्यांना कारच्या डाव्या बाजूची काच फुटलेली दिसली. त्यांनी आत डोकावले तेव्हा कारमधील रोकड चोरली गेल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी सिटी चौक पोलिसांना माहिती दिली. निरीक्षक विजय सोनवणे, उपनिरीक्षक विलास ताटीकोंडलवार यांनी धाव घेतली. चोरट्यांचा माग काढण्यासाठी घटनास्थळी श्वानपथक आणि ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. रात्री गुन्हा दाखल झाला.
सीसीटीव्ही फुटेज ताब्यात
रजिस्ट्री कार्यालयातील सीसीटीव्हीचे फुटेज हस्तगत करण्यात आले आहे. चोरांचा माग काढण्यासाठी दोन पथके इतरत्र रवाना करण्यात आली असून रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेत असल्याचे निरीक्षक सोनवणे यांनी सांगितले.