आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी सत्र सुरूच: एकाच परिसरात तीन घरफोड्या

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद: शहानूरवाडी, पैठण रोडवर चोरट्यांनी दोन दिवसांत तीन घरे फोडली. त्यांनी 2 लाख 75 हजार रुपयांचा ऐवज पळवला. तिन्ही घरफोड्या एकाच पद्धतीने झाल्या आहेत. त्यामुळे हे एकाच टोळीचे काम असावे, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
शहानूरमियां दर्गा परिसरातील प्रभातनगर येथे बँक ऑफ बडोदाचे सिडको मुख्य शाखेचे व्यवस्थापक ओमप्रकाश जगन्नाथ झालानी (वय 52) राहतात. त्यांच्या भावाचे गादिया विहार येथे घर आहे. भाऊ गावाला गेल्यामुळे त्याचे घर सांभाळण्यासाठी झालानी रविवारी गेले होते. त्याचा फायदा घेत चोरट्यांनी सोमवारी पहाटे त्यांच्या घरातील स्वयंपाकघराच्या चॅनल गेटचे कुलूप तोडून प्रवेश केला. बेडरूमच्या कपाटात ठेवलेल्या 20 हजार रोख रकमेशिवाय एक लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लांबवले. मंगळवारी सकाळी घरी परतल्यावर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांनी सोन्याची कर्णफुले, पदक, गणपतीची चांदीची मूर्ती पळवल्याचे झालानी यांनी तक्रारीत म्हटले आहे.

वरिष्ठ लिपिकाचे घर फोडले

याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपिक राजू भास्कर चित्ते यांचे साई-वृंदावन कॉलनीतील घर चोरट्यांनी भरदिवसा फोडले. सोन्याच्या पाच बांगड्यांसह सहा हजार रुपये पळवले. चित्ते यांच्या पत्नी घाटी रुग्णालयातील पॅथॉलॉजी लॅबमध्ये काम करतात. चित्ते दांपत्य बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास बाहेर पडले. त्यानंतर चोरट्यांनी पाठीमागील भिंतीवरून बंगल्यात शिरकाव केला. लोखंडी गेटची कडी वाकवत घरात प्रवेश करून प्रवेशद्वाराला आतून कडी लावली. यानंतर दुसर्‍या मजल्यावरील खोल्यांची कडी उघडून दोन कपाटे फोडली. बेडरूमच्या लोखंडी कपाटातील पाच तोळय़ांच्या बांगड्या आणि 6 हजार रुपये रोख या वेळी चोरट्यांनी लांबवले. दुपारी 12.45 च्या सुमारास घरी परतलेल्या प्रिया चित्ते यांनी प्रवेशद्वार उघडण्याचा प्रयत्न केला. प्रवेशद्वार उघडत नसल्याने त्यांना शंका आली. त्यामुळे त्यांनी पाठीमागील दरवाजा उघडा आहे का याची पाहणी केली. तेव्हा लोखंडी दरवाजाची कडी वाकवल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. प्रिया यांनी सातारा पोलिसांशी संपर्क साधला. दरम्यान टेंभापुरी येथील औषधी कंपनीचे कामगार अनिल गादगे यांचेही घर चोरट्यांनी फोडले. गादगेंची पत्नी मुलीला शाळेत सोडण्यासाठी घराला कुलूप लावून गेली होती. चोरट्यांनी त्यांच्या घराचा मागील दरवाजा तोडून चोरी केली.