आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेयसीच्या घरीच दरोडा; सोने विकून अक्षयने केली मित्रांसोबत ऐश!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- एटीएम फोडण्याच्या प्रयत्नात अटक करण्यात आलेल्या अक्षय चव्हाणने 40 तोळे सोने चोरीची कबुली दिली.हे सोने अक्षयने आपल्या प्रेयसीच्याच घरातून चोरी केले व ते थोडे-थोडे विकून त्याने मित्रांबरोबर ऐश केल्याचे निष्पन्न झाले, अशी माहिती पोलिस उपायुक्त अरविंद चावरिया यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. अक्षयने चोरलेल्या सोन्यापैकी 34 तोळे सोने जप्त केल्याचेही त्यांनी सांगितले.

चावरिया म्हणाले की,अक्षयचे त्याच्या घराजवळ राहणार्‍या वृद्धेच्या घरात नेहमी येणेजाणे होते. वृद्धेच्या नातीबरोबर प्रेमसंबंध असल्याचे त्याने सांगितले. त्याच घरातून त्याने 40 तोळे सोने चोरले. अक्षयने चोरी केल्याचे वृद्धेलाही कल्पना होती. मात्र, बदनामीच्या भीतीपोटी त्यांनी तक्रार दिली नाही. एटीएमप्रकरणी तपासात पोलिसांना या चोरीबद्दल माहिती मिळाली. पोलिस उपायुक्त अरविंद चावरिया यांनी स्वत: त्या वृद्धेची भेट घेऊन त्यांना विश्वास दिला होता. त्यानंतर सोमवारी (4 फेब्रुवारी) त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

सराफांना अटक होणार
पोलिसांनी अक्षयला दोन जानेवारीला अटक केली होती. वृद्धेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सात फेब्रुवारीला त्याला चोरीच्या गुन्ह्यात अटक करून न्यायालयाकडून 13 फेबुवारीपर्यंत पोलिस कोठडी मिळविली. त्यानंतर केलेल्या तपासात त्याने चोरीचे सोने दोन सराफांना विकल्याचे सांगितले. या सराफांनाही लवकरच अटक करणार असल्याचे चावरिया यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला सहायक पोलिस आयुक्त विजय पवार, पोलिस निरीक्षक हेमंत कदम, पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत खटके यांची उपस्थिती होती.

असा होता ऐवज
5 तोळ्यांची सोन्याची पोत, 6 तोळ्यांची साखळी, 5 तोळ्यांची अष्टपावली, 6 तोळ्यांच्या चार बांगड्या, 5 तोळ्यांच्या पाटल्या, 5 तोळ्यांचे तोडे, एक तोळा सोन्याच्या गळ्यातील दोन चेन, 5 तोळ्यांचे सोन्याचे लॉकेट, 6 ग्रॅमची एक अंगठी, 15 ग्रॅमच्या तीन अंगठय़ा असा ऐवज होता. यापैकी पाच तोळ्यांची पोत आणि अर्धा तोळ्याच्या दोन चेन अद्याप मिळालेल्या नाहीत.

मित्रांबरोबर केली ऐश
चोरलेले सोने थोडे थोडे विकून ऐश केल्याची कबुली अक्षयने दिली आहे. मित्रांसह गोव्यासह अनेक ठिकाणीही तो फिरला. तीन लाख 80 हजार रुपयांची एक इंडिका व्हिस्टाही त्याने घेतली होती. ही कारही पोलिसांनी जप्त केली आहे.

कारवाईचा इशारा
स्वस्त मिळणारे सोने चोरीचे असू शकते. याबाबत खात्री करून पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन अरविंद चावरियांनी केले आहे. चोरीचे सोने खरेदी करणार्‍यांविरुद्ध कडक कारवाईचा इशाराही त्यांनी दिला.

चोरी केलेले सोने कोणाच्या हाती लागू नये म्हणून अक्षयने अनोखा फंडा वापरला. दिवसभर तो सोने खिशात घेऊन फिरायचा आणि रात्रीच्या वेळी ते परिसरातील तेरणा हायस्कूलच्या मैदानात पुरायचा. दिवस उजाडण्याच्या आत गाडलेले सोने पुन्हा काढून घ्यायचा.