आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समोरच्या दरवाजाने आले अन् चोरी करून मगाच्या दाराने निघून गेले; 5 जणांवर मारला गुंगीचा स्प्रे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- पडेगावातील तोरणागड हाउसिंग सोसायटीतील एका घरातून चोरट्यांनी पंधरा हजार रोख आणि पाच तोळे सोन्याचे दागिने चोरल्याची घटना १८ जून रोजी मध्यरात्री घडली. समोरील दरवाजातून घरात प्रवेश करत झोपलेल्या पाच जणांच्या चेहऱ्यावर गुंगीचा स्प्रे मारल्याचा संशय आहे. चोरी करून चोरटे मागच्या दाराने निघून गेले. 

शिवलाल बाबूलाल वर्मा (५३) यांच्या घरात ही चोरी झाली. ते चिकलठाण्यातील हिंदुस्थान पेट्रोलियमच्या गॅस कंपनीत कार्यरत आहेत. मध्यरात्री चोरट्यांनी खिडकीची जाळी तोडून बैठक खोलीचा कडी कोयंडा काढून घरात प्रवेश केला. रविवारी रात्री त्यांची पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा घरात झोपले होते. ज्या खोलीत कपाट होते त्या ठिकाणी कोणीही नव्हते. चोरट्यांनी बेडरूममधील कपाटाचे कुलूप तोडून सोन्याचा नेकलेस, मंगळसूत्र, कानाचे डूल, वेल, नाकातील मोरणी, चांदीचा करंडा असे पाच तोळ्यांचे दागिने तसेच रोख पंधरा हजार रुपये लांबवले. मात्र, चोरांनी मोबाइलला हात लावला नाही. 

रात्री कॉलनीतील कुत्रे जोरजोरात भुंकत होते. त्यांच्याकडे परिसरातील नागरिकांनी लक्ष दिले नाही. वर्मा यांना पहाटे चारच्या सुमारास जाग आली. त्यांना शेजाऱ्यांनी घराचा दरवाजा उघडा असल्याचे सांगितले. तेव्हा वर्मा कुटुंबीयांनी घरातील वस्तूंची पाहणी केली तेव्हा बेडरूमच्या कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. तसेच शेजारील मोकळ्या प्लॉटमध्ये कपाटाचे ड्रॉवर फेकलेले होते. त्यानंतर छावणी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. श्वानपथकासह ठसे तज्ज्ञ छावणी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. उपनिरीक्षक के. बी. धनेधर यांनी पंचनामा केला. छावणी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान, या घटनेमुळे परिसरातील नागरिकांध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. परिसरात पोलिसांनी रात्री गस्त वाढवावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. 
बातम्या आणखी आहेत...