आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शस्त्रक्रियेसाठी उसने घेतलेले 2.5 लाख चोरले; ठाकरेनगरात साडेचार लाखांची घरफोडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - एन-2 मधील ठाकरेनगरातील प्रधान कुटुंबीयांवर मंगळवारी जणू संकटाचा कडा कोसळला. मेंदूच्या शस्त्रक्रियेसाठी उसने आणलेले अडीच लाख रुपये आणि बहीणभावाच्या लग्नासाठी खरेदी केलेले दोन लाख रुपयांचे दागिने चोरट्यांनी घर फोडून घशात घातले. एकूण साडेचार लाख रुपयांचा जबर फटका प्रधान कुटुंबीयांना बसला आहे.
सिद्धोधन प्रधान (36) यांनी आईच्या ‘ब्रेन हॅमरेज’वर शस्त्रक्रियेसाठी सोमवारी अडीच लाखांची उसनवारी करून रक्कम घरी ठेवली. उस्मानपुर्‍यातील सिटी केअर हॉस्पिटलमध्ये आई अत्यवस्थ असल्यामुळे सिद्धोधन रात्री दवाखान्यातच झोपले. दुपारी बारा वाजता शस्त्रक्रिया असल्याने सकाळी 11 वाजताच शस्त्रक्रियेची रक्कम ते भरणार होते. मात्र, मंगळवारी (24 जून) पहाटे भामट्यांनी घर फोडून अडीच लाखांची रोख आणि साडेचार लाखांचे दागिने लंपास केले. जमवाजमव केलेले पैसे हातचे गेल्याने हताश झालेल्या प्रधान कुटुंबीयांच्या डोळ्यात दिवसभर अश्रू तरळत होते..!
चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेले सेवानिवृत्त (महावितरण) तुकाराम प्रधान यांनी एन -2 मधील ठाकरेनगरातील बीएम-2/83 या इमारतीच्या तळमजल्यावरील सदनिका दीड वर्षापूर्वी भाडेतत्त्वावर घेतली आहे. त्यांना दोन मुली आणि दोन मुले आहेत. थोरली विवाहित मुलगी मुंबईत राहते. ठाकरेनगरात कुटुंबीयांसह मुलगा आणि दुसरी मुलगी राहते. सिद्धोधन वाळूज येथील मॅन डिझेल कंपनीत नोकरीला असून अविवाहित बहीण कुंदा साई अभियांत्रिकी महाविद्यालयात सहायक प्राध्यापिका आहे. बबलू हा धाकटा मुलगा पेप्सिको कंपनीत नुकताच नोकरीला लागला. आई सुमनबाईला 18 जून रोजी ‘ब्रेन हॅमरेज’ मुळे त्यांनी ‘अ‍ॅडमिट’ केलेले आहे. 19 आणि 23 जून रोजी आईवर दोन छोट्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून मंगळवारी मोठी शस्त्रक्रिया केली जाणार होती. डॉ. योगेश वरगंटीवार यांनी अडीच लाखांची तरतूद करून ठेवण्याचे प्रधान भावंडांना सांगितले होते. त्यानुसार सिद्धोधन आणि कुंदा यांनी मित्र मैत्रिणीकडून अडीच लाखांची तजवीज केली व घरी ठेवली. सिद्धोधन दवाखान्यात झोपले होते, मंगळवारी पहाटे घरी आल्यानंतर त्यांना घरफोडी झाल्याचे निदर्शनास आले. घरातील अडीच लाखांची रोख रक्कम आणि दोन लाख रुपयांचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांचे अवसान गळाले. भामट्यांनी अडीच लाख रुपयांसह कुंदा आणि सिद्धोधन यांच्या विवाहासाठी जमवलेले दागिनेही लंपास केले. त्यामध्ये तीन मंगळसूत्र, तीन सोनसाखळ्या, दोन जोड कर्णफुले, अंगठ्या, पैंजण, जोडवे आदी दागिन्यांचा समावेश आहे. दरम्यान डॉक्टरांना विनंती केल्यानंतर त्यांनी दुपारी सुमनबाई यांच्यावर शस्त्रक्रिया केली. मात्र काही रक्कम लवकरच आणण्यास त्यांना सांगितले.
पहाटे 4 वाजता घरफोडी झाल्याचा पोलिसांचा तर्क
मुकुंदवाडी पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांच्यासह नेहमीच्या गस्ती पथकाने रात्री तीनपर्यंत याच परिसरात गस्त घातली. त्यानंतर पहाटे चारच्या सुमारास ही घरफोडी झाली असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त अरविंद चावरिया, सहायक पोलिस आयुक्त गणेश राठोड, पोलिस निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे, एपीआय मधुकर साळवे, पोलिस उपनिरीक्षक एस. एम. कसबे यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
एन-2 मध्येच दुसरी घरफोडी
क्रिकेट स्टेडियमच्या प्रवेशद्वारासमोरील एएच-1/78 प्लॉटवरील नलिनी गोरक्ष यांच्या घरीही पहाटे चोरट्यांनी डल्ला मारला. चांदीचे फुलपात्र, हळदी कुंकुवाचा चांदीचा करंडा, पूजेसाठी वापरात येणारे चांदीचे नाणे आणि पाचशे रुपयांची रोख रक्कम त्यांनी पळवली. पाठीमागच्या संरक्षक भिंतीवर उडी मारून गच्चीवर आल्यानंतर त्यांनी लोखंडी पायर्‍यांचा वापर केला व पुढील दरवाजाचे कुलूप फोडले. या प्रकरणी फिर्याद आली नसल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.