आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजेशनगरात सशस्त्र दरोडा; महिलेला मारहाण करत दरोडेखोरांनी दागिने पळवले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- बीड बायपासपासून 500 मीटर अंतरावर असलेल्या राजेशनगरात सात दरोडेखोरांनी मंगळवारी रात्री दोनच्या सुमारास सशस्त्र दरोडा टाकून 17 हजार रोकडसह दोन तोळ्यांचे दागिने हिसकावून नेले. महिला घरात एकटी असल्याची संधी साधत दरोडेखोरांनी एक तास धुमाकूळ घातला.

आशा गणेश पांढरे (40) या मुलगा आणि सुनेसह दोन वर्षांपासून राजेशनगरात राहतात. मुलगा, सून बाहेरगावी गेल्याने त्या घरी एकट्याच होत्या. मंगळवारी रात्री त्या बैठक खोलीत झोपल्या असता दोनच्या सुमारास घराच्या पाठीमागील पाच फुटांच्या भिंतीवरून दरोडेखोर गॅलरीत गेले. पाठीमागील दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरात शिरले. काळे कपडे आणि तोंडाला रुमाल बांधलेल्या दरोडेखोरांना पाहून आशाबाई घाबरल्या. आरडाओरड केल्याने दरोडेखोरांनी त्यांचे तोंड दाबत चाकूचा धाक दाखवून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने हिसकावले. त्यानंतर कपाटातील 17 हजार रुपयेही घेतले. आणखी पैसे कुठे आहेत, असे म्हणत त्यांना लाथाबुक्क्याने मारहाण केली व मोबाइल गच्चीवर फेकला. सकाळपर्यंत आवाज करायचा नाही, असा दम देत आशाबाईंना बेडरूममध्ये डांबून ठेवले. एक तास धुमाकूळ घातल्यानंतर रात्री तीनच्या सुमारास दरोडेखोर पाठीमागील दरवाजाने पळून गेले. पोलिस उपायुक्त अरविंद चावरिया, सहायक पोलिस आयुक्त सुखदेव चौगुले, निरीक्षक जयकुमार चक्रे, उपनिरीक्षक महेश आंधळे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी घटनास्थळाची पाहणी केली. श्वानपथकाचे उपनिरीक्षक बी. बी. बनसोडे घटनास्थळी दाखल झाले. मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा दाखल झाला.