आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जर्मनीला गेलेल्या दांपत्याच्या घरी चोरी; चाकू लावून तीन लाखांचा ऐवज लुटला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- चाणक्यपुरीतील गोपी बिल (शर्मा) आणि मीना बिल यांच्या घरी तीन जणांनी गुरुवारी सशस्त्र चोरी केली. बिल दांपत्य मुलाला भेटण्यासाठी जर्मनीला गेले असता सुरक्षा रक्षकाच्या गळ्याला चाकू लावून रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने असा दोन ते तीन लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला असल्याचा अंदाज बिल यांच्या नातेवाइकांनी व्यक्त केला आहे. याबाबत अद्याप कुणाचीच फिर्याद आली नसल्याने गुन्हा दाखल झाला नसल्याचे जवाहरनगर ठाण्याचे निरीक्षक हेमंत कदम यांनी सांगितले.

कंत्राटदार असलेले गोपी बिल (शर्मा) आणि एका इंग्रजी शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत मीना यांचा चाणक्यपुरीत ‘बी’ बिल्डिंगमध्ये पहिल्या मजल्यावर सातव्या क्रमांकाचा फ्लॅट आहे. त्यांचा मुलगा निहित जर्मनी येथे इंजिनिअर आहे. शर्मा दांपत्य 40 दिवसांची सुटी घेऊन 25 दिवसांपूर्वी जर्मनीला गेले आहेत. सुरक्षा रक्षक आर. आर. राऊत यांच्या गळ्याला चाकू लावून चोरटे फ्लॅटमध्ये घुसले. ज्या कपाटात सोन-चांदीचे दागिने ठेवलेले होते, नेमके त्याच कपाटावर चोरट्यांना घाव घातला. बिल यांचे नातेवाइक सुमन शर्मा यांनी जर्मनीला फोन करून घटना कळवली. त्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार अंदाजे दोन ते तीन लाखांचा ऐवज चोरट्यांनी लुटला आहे. चोरी करून पळण्यापूर्वी राऊतला तिघांनीही घरात डांबून ठेवले. दरम्यान, राऊत ओरडत असताना गस्त घालणार्‍या पोलिसांनी राऊतचा आवाज ऐकला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. शर्मा दांपत्य 2 ऑक्टोबरला परतणार असून त्या वेळीच नेमका किती ऐवज पळवला याची माहिती मिळेल.