आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद- दुचाकीला धडक दिली म्हणून व्यापार्याला भांडणात गुंतवून त्याच्या कारमधील चार लाखांची बॅग दुचाकीवर आलेल्या दोघा भामट्यांनी लंपास केली. ही घटना जालना रोडवरील अपना बाजारजवळ गुरुवारी (24 जानेवारी) दुपारी सव्वाबाराच्या सुमारास घडली.
व्यापारी तुषार अजमेरा (33) यांनी दुपारी 11.44 वाजता आकाशवाणी येथील एचडीएफसी बँकेतून चार लाख रुपये काढले. ही रक्कम लाल रंगाच्या कापडी पिशवीत ठेवून ते बँकेतून बाहेर पडले. त्यानंतर पैसे असलेली पिशवी कारच्या डावीकडील बाजूच्या सीटजवळ ठेवली. कारने (एमएच 20 बीवाय 7722) सेव्हन हिल्सकडे गेले. तेथून कार वळवल्यानंतर आकाशवाणीकडे जात असताना काळ्या रंगाच्या सीबीझेड दुचाकीवर आलेल्या दोघांनी कारच्या डिक्कीवर थाप मारली. त्यामुळे अजमेरा यांनी कार जागेवरच थांबवली. दुचाकीस्वारांनी अजमेरा यांच्याशी हुज्जत घालून धडक मारल्यामुळे आमच्या गुडघ्याला मार लागल्याची बतावणी करत पंधरा मिनिटे वाद घातला. यादरम्यान त्यांच्या एका साथीदाराने कारमधील रोख रकमेची बॅग लंपास केली. साथीदाराने बॅग पळवल्याचे पाहिल्यानंतर दोन्ही भामट्यांनी दुचाकीवरून पळ काढला. दुचाकीस्वार राँग साइडने सेव्हन हिल्सकडे निघून गेल्यानंतर अजमेरा कारमध्ये बसले. या वेळी बॅग चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अजमेरा यांनी घटनेची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.