आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घाटीतील दानपेटी फोडली; आठ खोल्यांचे कडीकोयंडे तोडले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- कॅन्सरच्या उपचारासाठी घाटीत येणार्‍या गरीब रुग्णांना आर्थिक मदत मिळावी म्हणून किरणोपचार विभागाच्या दुसर्‍या मजल्यावर ठेवण्यात आलेली लोखंडी दानपेटी फोडून दोन चोरट्यांनी पळ काढला. चोरीच्या उद्देशाने विभागातील आठ खोल्यांचे कडीकोयंडे तोडल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस आले. मात्र, रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली नाही.

हा विभाग नव्या इमारतीत स्थलांतरित झाल्यापासून दुसर्‍या मजल्यावर कोणाचाही वावर नाही. पायांच्या ठशावरून दानपेटीवर डल्ला मारणारे दोघे असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. रविवारी मध्यरात्री चोरांनी अपघात विभागाकडून येत या विभागाच्या पाठीमागील चॅनल गेटचे कुलूप तोडले. यानंतर पहिल्या आणि दुसर्‍या मजल्यावरील आठ खोल्यांचे कडीकोयंडे चोरट्यांनी टॉमीने तोडले.

रुग्ण विभागात असलेल्या दानपेटीचे कुलूप तोडत ती खाली आणली. यामध्ये पैसे होते की नाही हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. सोमवारी सकाळी विभागाची साफसफाई करण्यासाठी आल्यानंतर दर्शना कागडा यांच्या हा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी याची माहिती वरिष्ठांना दिली. त्यानंतर बेगमपुरा पोलिसांसह श्वानपथकाचे पोलिस उपनिरीक्षक बी. बी. बनसोडे घटनास्थळी दाखल झाले. मात्र, रात्रीपर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

देशी दुकानातून चोरटा पसार
चोरट्यांचा माग काढत श्वान लुसी बेगमपुर्‍यातील देशी दारूच्या दुकानापर्यंत पोहोचली होती. या वेळी पोलिसांना आणि श्वानाला पाहून लाल रंगाचा शर्ट घातलेला चोरटा पसार झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. चोरी झालेल्या विभागात पोलिसांना चोरांच्या पायांचे ठसे मिळाले.