आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेड-मनमाड पॅसेंजरमध्ये लूटमारीचे सत्र; प्रवासी भयभीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - नांदेडहून मनमाडकडे जाणा-या पॅसेंजर रेल्वेगाडीत लूटमारीच्या घटना नियमित घडत आहेत. मात्र, रेल्वे पोलिस बेफिकीर असल्याने प्रवासी भयभीत झाले आहेत. रात्री धावणा-या या पॅसेंजर गाडीमध्ये शिरून चोरट्यांचे टोळके प्रवाशांना लुटत आहे. तक्रार करूनही रेल्वे प्रशासन आणि पोलिस दखल घेत नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
22 जून रोजी नांदेड - मनमाड पॅसेंजरने प्रवास करणा-या निखिल वाकोडकर, शैलेश खरात या तरुणांनी ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीला सांगितले की, पॅसेंजर गाडी क्रमांक 57542 औरंगाबाद रेल्वेस्टेशनवरून रात्री दोनच्या सुमारास निघाली. दोन वाजून 20 मिनिटांच्या दरम्यान गाडीने दौलताबाद रेल्वेस्टेशन गाठले. गाडीत मोजकेच प्रवासी होते. दौलताबाद स्टेशनवर मद्यधुंद अवस्थेतील 10 ते 12 तरुणांचे टोळके गाडीत शिरले. त्यांनी झोपलेल्या प्रवाशांना मारहाण करत त्यांच्या खिशातील पाकिटे हिसकावून घेत त्यातील पैसे काढून घेण्यास सुरुवात केली. विरोध करणा-या प्रवाशांना ते अर्वाच्य शिवीगाळ करून मारहाण करीत होते. या घटनेमुळे डब्यात घबराट पसरली. काही वेळताच लासूर स्टेशन आले. हे टोळके तेथे उतरले आणि पुढच्या डब्यात गेले. तेथेही हाच प्रकार घडला. या डब्यात यांनी एका महिलेला माराहण करून ब्लेडने तिचे मंगळसूत्र कापून नेले. त्यामुळे या डब्यात आरडाओरड सुरू झाली. करजगाव स्टेशनवर हे टोळके शिव्या देतच डब्यातून उतरले. काही प्रवाशांनी हिंमत दाखवून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, शस्त्रांचा धाक दाखवून या टोळक्याने पळ काढला. काही प्रवाशांनी करजगावच्या स्टेशन मास्तरकडे तक्रार केली. मात्र, त्यांनी हात वर करून मनमाड किंवा औरंगाबाद चौकीत तक्रार करण्याचा सल्ला दिला. ज्या महिलेचे मंगळसूत्र लुटले तिनेदेखील भीतीपोटी कोठेही तक्रार केली नाही.
प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर
नांदेड - मनमाड पॅसेंजरमध्ये रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी दिसत नाहीत. शिवाय प्रवाशांना तक्रार करायची झाल्यास मनमाड आणि औरंगाबाद येथेच चौकी आहे. औरंगाबाद रेल्वेस्टेशनवरील चौकीअंतर्गत 20 रेल्वेस्टेशन येतात. या रात्री उशिराने जाणा-या पॅसेंजरमध्ये अनेक महिला आणि लहान मुले प्रवास करतात. मात्र, त्यांच्या संरक्षणाची कुठलीही काळजी रेल्वे प्रशासन घेत नाही. या पॅसेंजर गाडीत अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याचे प्रवासी सांगतात.
तपास करून टोळीला पकडू
४गेल्या वर्षभरात करजगाव किंवा नांदेड-मनमाड पॅसेंजर गाडीत अशा प्रकारची घटना घडल्याची एकही नोंद नाही. काही दिवसांपूर्वी आम्ही एक टोळी जेरबंद केली होती. त्यानंतर या घटना बंद झाल्या होत्या. मात्र, असे काही घडत असल्यास त्याचा तपास करून या टोळीला पकडले जाईल.
- एस. जी डमाले, सहायक पोलिस निरीक्षक, औरंगाबाद रेल्वेस्थानक