आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैजापूरात पीक कर्जाचे ५० हजार पळवले, महाराष्ट्र बँकेसमोरील घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर- बँकेतून पीक कर्जाचे पैसे काढून भावासोबत दुचाकीवर बसलेल्या महिलेच्या हातातून ५० हजार रुपयांची रोकड असलेली पिशवी धूमस्टाइल दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी हिसकावून पोबारा केल्याची खळबळजनक घटना सोमवारी दुपारी शहरातील डेपो रोडवरील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेसमोर घडली. या ठिकाणी उपस्थितांनी दुचाकीचा पाठलाग केला, मात्र ते हाती लागले नाहीत. हा प्रकार गजबजलेल्या ठिकाणी भरदिवसा घडल्याने नागरिकांत दहशतीचे वातावरण पसरले आहे.
हनुमंतगाव येथील सुमनबाई लक्ष्मण भांडे या आपला बंधू आबासाहेब विठ्ठल आव्हाळे यांच्यासोबत येथील डेपो रोडवरील बँक ऑफ महाराष्ट्रात पैसे काढण्यासाठी आल्या होत्या. दुपारी १ वाजेच्या सुमारास त्यांनी आपल्या खात्यातून १ लाख रुपये काढले. यातील ५० हजार रुपये आबासाहेब यांनी आपल्याकडे ठेवले, तर उर्वरित ५० हजार रुपये हे सुमनबाई यांनी आपल्याजवळील एका पिशवीत अन्य कागदपत्रांसोबत ठेवलेले होते. बँकेतून बाहेर आल्यावर त्या आबासाहेब यांच्या मोटारसायकलवर बसून आपल्या माहेरी आघुरला जाण्यास निघाल्या होत्या. त्याच वेळी समोरून एक विनाक्रमांकाची काळ्या रंगाची युनिकाॅर्न मोटारसायकल आली. यामुळे आबासाहेब यांनी आपली गाडी थांबवली असता समोरून आलेल्या मोटारसायकलवरील पाठीमागे बसलेल्याने सुमनबाई यांच्या हातातील पैशाची पिशवी हिसकावली व त्यांना जोराचा धक्का देत पोबारा केला.
सुमनबाई यांना आपल्या हातातील पिशवी पळवल्याचे समजताच त्यानी आरडाओरडा केला. आबासाहेब यांनी त्यांना बँकेच्या पायऱ्यांवर बसवत त्या मोटारसायकलचा पाठलाग केला, तर सुमनबाई यांचा आरडाओरडा व सुसाट गेलेल्या मोटारसायकलमुळे या ठिकाणी उभे असलेले गणेश पवार, ऋषिकेश अनर्थे यांनीही आपल्या मोटारसायकलवरून भामट्यांचा पाठलाग सुरू केला. त्यांनी नागपूर-मुंबई महामार्गावरील लाडगाव चौफुलीपर्यंत त्यांचा पाठलाग केला.
मात्र भामट्यांनी त्यांना गुंगारा देत कोपरगावच्या दिशेने पळ काढला.या घटनेची माहिती समजल्यावर यथावकाश पोलिसांच्या पथकाने धाव घेत पाहणी केली.
अन् भावाजवळील ५० हजार रुपये वाचले
वैजापूर तालुक्यातील हनुमंतगाव
येथील सुमनबाई लक्ष्मण भांडे यांची गावात पाच एकर जमीन असून त्यांचे पती वायरमन आहेत. सुमनबाई या आपले बंधू आबासाहेब आव्हाळे यांच्यासोबत बँकेत आल्या. बँकेतून पीक कर्जाची रक्कम एक लाख काढली. ५० हजार स्वत:जवळ व ५० भावाजवळ दिले. दरम्यान, त्यांच्या हातातील पैशाची पिशवी चोरट्यांनी पळवली.

पाेलिसांचा दरारा कमी झाल्याने चोरटे सक्रिय
वाढत्या चोऱ्यांच्या सत्रामुळे नागरिकांत कमालीची भीती निर्माण झाली आहे. पोलिसांचा दरारा कमी झाल्याने चोरट्यांचे मनोबल वाढल्याचे पाहावयास मिळत आहे. मागील काही चोऱ्यांचा तपास लावण्यात पोलिस प्रशासन अपयशी ठरले आहे. पोलिस मात्र केवळ तपास सुरू आहे, लवकरच तुमचा ऐवज परत देऊ, असा पोकळ दिलासा देऊन नागरिकांची बोळवण करत आहेत. वर्षभरातील अपवाद वगळता मोठ्या चोरीचा तपास लागला नाही.