औरंगाबाद- पोलिसांनी आधी सांगितलं, कपाटातून काय काय चोरीला गेलंय ते तपासा आणि नंतर कपाटाला हात लावून पुरावे नष्ट केले म्हणून दोष दिल्याने घरफोडीत 65 हजारांचा ऐवज गमावलेल्या संगीता ढगे अवाक् झाल्या. फिर्यादीनंतर तीन तासांनी आलेले ठसेतज्ज्ञ आणि पोलिसांसह शेजार्यांनीही ‘डिस्टर्ब’ केलेले घटनास्थळ यामुळे ठसे आणि ठोस पुरावे मिळवण्यात पोलिसांना अपयश आले.
खोकडपुर्यातील कामगार कॉलनीत राहणारे भगवान भिकनराव ढगे यांच्या घरी रविवारी (25 मे) पहाटे चोरी झाली. केवळ 80 चौरस फुटांचे त्यांचे घर असून ते गच्चीवर रात्री आपल्या कुटुंबीयांसह झोपले होते. पहाटे 5:30 वाजता घरफोडी झाल्याचे लक्षात आल्यानंतर सहा वाजता क्रांती चौक पोलिसांना त्यांनी प्रत्यक्ष भेटून कळवले. सात वाजता पोलिसांनी घटनास्थळ गाठले. आठ वाजता श्वानपथक तर नऊ वाजता फिंगरप्रिंटची टीम दाखल झाली; पण तोपर्यंत चोरट्यांनी फोडलेल्या कपाटाला अनेकांचे हात लागले होते.
सोने, रोकडसह चार मोबाइल लांबवले
पाच ग्रॅमची कर्णफुले, अंगठी आणि सोन्याच्या मण्यांसह 25 हजारांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. त्याशिवाय ‘दिव्य मराठी’च्या वार्षिक वर्गणीवर मिळालेले प्लास्टिक बाऊलचे गिफ्टही त्यांनी सोडले नाही.
नोकिया, लाव्हा,
सॅमसंग, बंद पडलेला विनकॉम या कंपनीचे मोबाइलसुद्धा चोरले आहेत. नव्या कोर्या आयस्ट्रा स्कूटरची चावी खिशात घातली, मात्र बाहेर आल्यानंतर त्यांना स्कूटर शेजार्यांच्या अंगणात उभी असल्याचे दिसले, अन् स्कूटरभोवती अनेक जण झोपलेले असल्यामुळे त्यांनी स्कूटर चोरण्याऐवजी तेथून धूम ठोकली.
ढगे यांच्या घरातील सर्वजण 15 फुटांवर असलेल्या गच्चीवर झोपले असता चोरट्यांनी संधी साधली. इन्सेट : तुटलेला कडीकोयंडा. छाया : रवी खंडाळकर
मोबाइल ट्रेस करण्यात अडचणी
चारपैकी तीन मोबाइल चोरट्यांनी त्वरित बंद केले. मात्र 8698082605 हा क्रमांक दुपारपर्यंत सुरूच होता. पण आएमईआय (इंटरनॅशनल मोबाइल इक्विपमेंट आयडेंटिटी) क्रमांक त्यांच्याकडे नसल्यामुळे मोबाइल ट्रेस होत नव्हता. त्यासाठी मोबाइल खरेदी केल्याची पावती शोधण्याच्या सूचना दिल्या. क्रांती चौक ठाण्यातील तपासी जमादार व्ही. एस. शिंदे यांच्या मते भामटे सिमकार्ड काढून फेकून देतात, मोबाइलमध्ये दुसरे कार्ड टाकतात. सिमकार्ड बदलल्यामुळे सीडीआर (कॉल डिटेल्स रेकॉर्ड) उपलब्ध होऊ शकत नाही.