आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोळ्यांत मिरची पूड फेकून ३३.५० लाख लुटण्याचा प्रयत्न, बंदुका व्हॅनमध्ये ठेवून पैसे भरण्याचे धाडस!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - रायटर सेफगार्ड कंपनीच्या व्हॅनमधून एचडीएफसीच्या एटीएममध्ये रोकड भरण्यासाठी आलेल्या सुरक्षा रक्षांसह कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात िमरची पूड टाकून बॅगमधील ३३ लाख ५० हजार रुपये लुटण्याचा प्रयत्न एका लुटारूने केला. मात्र, डोळ्यांची आग होत असतानाही एटीएम ऑफिसर संदीप धामोडे यांनी जिवाची पर्वा न करता रोकड असलेली बॅग कवटाळून धरली. लाथाबुक्क्यांनी हल्ला करूनही लुटारू बॅग हिसकावू शकला नाही. सुरक्षारक्षकांनी त्यांच्याकडील बंदुका व्हॅनमध्ये ठेवल्याने चोरटा ही हिम्मत करू शकला. हा प्रकार बजाजनगरातील गजबजलेल्या महाराणा प्रताप चौकात सोमवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घडला.
यापूर्वी वाळूज औद्योगिक परिसरातील तिरंगा चौक व मोरे चौक बजाजनगर येथील एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला आहे. चाकूच्या धाकावर तिरंगा चौकातील एटीएममधून रोख १५ हजार रुपये लुटल्याची घटना ४ जुलै रोजी घडली. वाळूज परिसरातील ‘एटीएम सुरक्षा वाऱ्यावर’ या मथळ्याखाली "दिव्य मराठी'ने वृत्त प्रसिद्ध करून संबंधित बँका व पोलिस प्रशासनाच्या िनदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. या अाशयाचे सविस्तर वृत्त १० डिसेंबर २०१३ व १२ जून २०१४ रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते. संबंधित सुरक्षा अधिकारी व कर्मचाऱ्यांना तत्काळ परिसरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या डोळ्यांत ड्राॅप टाकून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
असा झाला लुटीचा प्रयत्न : एचडीएफसी एटीएम मशीनमध्ये नोटा भरण्याचे कंत्राट शहरातील रायटर सेफगार्ड कंपनीकडे आहे.

बंदुका होत्या, पण व्हॅनमध्ये : दोन्ही सुरक्षा रक्षकांकडे शस्त्र (बंदूक) होते. मात्र, त्यांनी ते जवळ बाळगले नव्हते. शस्त्र जवळ असते तर एकाच लुटारूने दोन्ही सुरक्षा रक्षकांशी झुंज देण्याची हिंमत केली नसती.
घटनास्थळी पोलिस धावले
वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यापासून हाकेच्या आंतरावर असलेल्या चौकात घटना घडल्यामुळे घटनेची माहिती िमळताच पोलिसांनी धाव घेतली. तसेच शहरातून गुन्हे शाखेचे पोलिस कर्मचारीही घटनास्थळाची पाहणी करून गेले. रायटर सेफगार्ड कंपनीचे शाखा व्यवस्थापक कमलेश बांगडे, सहायक व्यवस्थापक बाबासाहेब अंभोरे, लोकेशन इन्चार्ज शिवाजी पवार आदीं नी घटनास्थळी धाव घेतली.
चोरटा चवताळला
रक्कम हाती लागली नाही म्हणून संतप्त झालेल्या तरुणाने सुरक्षा रक्षक हनिफ शहांवर हल्ला चढवला. मात्र, दणकट शरीराचे शहा त्या तरुणावर भारी पडू लागले. त्यामुळे त्याने पुन्हा शहांच्या डोळ्यात िमरची पूड टाकली. त्यानंतर काही घडलेच नाही या अाविर्भावात तो भिंतीवरून उडी मारून निघून गेला. फायरमन हरिश्चंद्र बुरंगे यांनी त्याला जाताना बघितले.
...तर मदतीला धावले असते
दोन तरुणांमध्ये भांडण सुरू आहे असे वाटल्यामुळे त्यांच्या मदतीला धावून गेलो नाही. सुरक्षा रक्षक किंवा एखादा कर्मचारी चोर-चोर असे म्हणून ओरडला असता तर नक्कीच लोक मदतीला धावले असते.
दीपक गायकवाड, प्रत्यक्षदर्शी.
तक्रारीनंतर गुन्हा नोंदवू
बजाजनगरातील महाराणा प्रताप चौकात पैसे लुटण्याचा प्रयत्न झाला आहे. मात्र, बँकेच्या वतीने अद्याप कोणीही फिर्याद देण्यासाठी आलेले नाही. तक्रारीनंतर गुन्हा नोंदवून घेतला जाईल.
इंदलसिंग बहुरे, पोलिस िनरीक्षक, एमअायडीसी वाळूज पोलिस ठाणे