औरंगाबाद- जालना रोडवरील कुशलनगरातील सिटी चिट फंड कंपनीचे कार्यालय फोडून चोरट्यांनी 3, 89, 393 रुपये असलेली तिजोरी लंपास केली. ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली असून मंगळवारी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
‘सिटी चिट फंड’च्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरटे आत घुसले व आतमधील तिजोरी फोडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र ती फुटत नसल्याने त्यांनी तिजोरी घेऊन पळ काढला. या तिजोरीत 12 सदस्यांची रक्कम होती. या कंपनीचे मुख्य कार्यालय नांदेड येथे असून औरंगाबाद, लातूर आणि अहमदनगर येथे शाखा कार्यालये आहेत. मागील पाच वर्षांपासून येथील कार्यालय सुरू आहे. 20 जुलै रोजी सकाळी 11 वाजता नेहमीप्रमाणे कार्यालयात भिशीचा लिलाव झाला. लिलाव संपल्यानंतर कंपनीचे व्यवस्थापक सॅम्युअल सॅमसन (रा. भावसिंगपुरा) यांनी जमा झालेले भिशीचे 3, 89, 393 रुपये तिजोरीत ठेवले. सोमवारी (21 जुलै) कंपनीचा कर्मचारी झुबेर हा कार्यालय उघडण्यासाठी आला तेव्हा घडलेला प्रकार त्याच्या लक्षात आला. त्याने ही बाब सॅम्युअल यांना कळवली. मात्र पोलिसांनी सर्व मूळ कागदपत्रांची मागणी केल्याने सोमवारी तक्रार देण्यात आली नव्हती. मंगळवारी सकाळी सॅम्युअल यांनी जवाहरनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे.