आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिडको महानगरात घर फोडून सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज-सिडको वाळूज महानगर-2 येथील बंगल्यात भरदिवसा घरफोडी करून सव्वादोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना शुक्रवारी (सात मार्च) घडली. याच परिसरातून गेल्या आठवड्यामध्ये महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी लांबवले आहे. चोरीच्या वाढत्या घटनांमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे, तर पोलिस प्रशासनाच्या कार्यकुशलतेवरही असंतोष व्यक्त होत आहे.
वाळूज महानगर क्र. 2 मधील निखिल अनिल लखपती (24, रा.प्लॉट नं 57 सिडको वाळूज महानगर-2) यांच्या वडिलांवर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आल्यामुळे त्यांना औरंगाबाद येथील नातेवाइकांकडे ठेवण्यात आले होते. वडिलांना अणण्यासाठी ते शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास घराला कुलूप लावून शहरात गेले. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ते परत आले. ते दरवाजा उघडत होते. मात्र दरवाजाची कडी आतून लावल्यामुळे दरवाजा उघडत नव्हता. दरम्यान, त्यांनी मागील बाजूने घरात प्रवेश करताच घरातील सामान अस्ताव्यस्त आढळून आल्यामुळे घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ वाळूज एमआयडीसी पोलिसांना सदरील घटनेची माहिती दिली.
चोरट्यांनी बंगल्याच्या वरील बाजूने जिन्यावरील असणारा पत्रा उचकटून बंगल्यात प्रवेश केला. घरामधील कपाट तोडून त्यातील सोन्या-चांदीचे दागिने तसेच घरातील रोख चार हजार दोनशे रुपये व एक मोबाइल असा अंदाजे 2 लाख 15 हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी निखिल यांच्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नरहरी शिंदे करत आहेत.
गुन्हेगारीचे प्रमाण वाढले
वाळूज औद्योगिक परिसरामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीचा आलेख वाढत असल्याचे दिसत आहे. गेल्या 10 दिवसांमध्ये अनेक गंभीर गुन्ह्यांची येथे नोंद झाली आहे. त्यात सुवर्णा वसंत हजारे यांचे 45 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र जयभवानी चौकातून 2 मार्च रोजी लंपास करण्यात आले. याच चौकालगत राहणार्‍या कविता संतोष खंडाळकर यांच्या गळ्यातील 61 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र 24 फेब्रुवारी रोजी दुचाकीस्वारांकडून लंपास करण्यात आले. मात्र, वारंवार पोलिस ठाण्यात चकरा मारूनही या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल क रून घेतला नव्हता. केवळ घटनेची नोंद करण्यात आली. अखेर खंडाळकर यांनी तगादा लावल्यानंतर गुरुवारी (सहा मार्च) गुन्हा दाखल केला. दरम्यान, 28 फेब्रुवारी रोजी रांजणगाव शेणपुंजी येथील महिलेवर बलात्कार केल्याचा गुन्हा पोलिसांत नोंद झाला. औद्योगिक परिसरामध्ये चहाची टपरी चालवणार्‍या कुटुंबीयांकडून ग्राहकाचा खून झाल्याची घटना याच दिवशी घडली. त्यात भर टाकणारी आणखी एका खुनाची घटना जोगेश्वरी शिवारामध्ये गुरुवारी (6 मार्च) रोजी घडली.