आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भल्या पहाटे उधळला दरोड्याचा डाव; भल्या पहाटे उधळला दरोड्याचा डाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - खून, खुनाचा प्रयत्न करणार्‍या आणि दरोडे घालण्यात पटाईत असलेल्या एका आंतरराज्य टोळीला सिडको पोलिसांनी शनिवारी पहाटे सहा वाजता जेरबंद केले. पिसादेवी रोडवरील पॉवर हाऊसजवळ सहापैकी पाच जणांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. त्यांच्याकडून विदेशी बनावटीचे पिस्तूल, चार काडतुसे, दोन फायटर आणि दरोड्यासाठी लागणारे साहित्य हस्तगत करण्यात आले. टोळीचा म्होरक्या विजय परदेशी फरार आहे. त्याच्या शोधासाठी मध्य प्रदेशात सिडको पोलिसांची टीम रवाना करण्यात आली आहे.
गुन्हे प्रकटीकरण (डीबी) शाखेचे पोलिस उपनिरीक्षक गोरख चव्हाण यांचे पथक शुक्रवारी रात्री 12 ते शनिवारी सकाळी सहा वाजेदरम्यान रात्री गस्त घालत होते. त्या वेळी सहा जण दरोड्याच्या प्रयत्नात पिसादेवी रोडवरील पॉवर हाऊसच्या परिसरात दबा धरून बसल्याची माहिती खबर्‍याने दिली. चव्हाण व पथकातील भीमराव पवार, संपत राठोड, सुखदेव जाधव, दीपक शिंदे, शिरीष वाघ, मिलिंद भंडारी, राजेंद्र घुनावत यांना पहाटे साडेचार वाजता पॉवर हाऊस परिसरात काळ्या रंगाची पल्सर, निळ्या रंगाची ‘अपाची’ अशा दोन दुचाक्या उभ्या दिसल्या. लपून बसलेल्या सहा जणांवर पोलिसांनी झडप घातली. झटापटीत विजय परदेशी फरार झाला. अमोल सुरेश पानकडे (22, रा. गंगापूर), राकेश सुरेश खंडागळे, (19, रा. गंगापूर) स्वप्निल गणेश गायकवाड (20, रा. गंगापूर), श्रीकांत बारकू दुशिंग (23, रा. नवीन कायगाव, गंगापूर) आणि शेख सादिक शेख रफिक (20, रा. पेंढापूर, गंगापूर) अशी अटक केलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. परदेशी पळून जाण्यात यशस्वी झाला. तो मध्य प्रदेशातील सेंधवा येथील रहिवासी असावा, असा पोलिसांना संशय आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले.

पिसादेवी परिसर होते टार्गेट
आरोपींकडून विदेशी बनावटीचे 7.65 एमएमचे पिस्तूल हस्तगत केले आहे. त्याशिवाय एक रामपुरी चाकू, मिरची पूड, नायलॉनचा जाड दोरखंड, दोन फायटर, लाकडी दांडा, टीव्हीएस कंपनीची अपाची दुचाकी (एमएच 20 सीजे 7970) आणि बजाज पल्सर (एमएच 20 सीडब्ल्यू 4195) हस्तगत केली. रस्त्याने जाणार्‍या बड्या असामींना लुटण्याच्या उद्देशाने पिसादेवी परिसरात ही टोळी आली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. फरार झालेल्या परदेशीकडे आणखी पिस्तूल असू शकते, असे चावरिया यांनी सांगितले. दरम्यान, पाचही आरोपींना तीन जुलैपर्यंत पोलिस कोठडी देण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. शेख यांनी दिले. सरकारपक्षातर्फे अ‍ॅड आशिष दळे यांनी काम पाहिले.
नेवासा, ग्रामीण भागात हैदोस
टोळीने गंगापूर, नेवासा, अहमदनगर, औरंगाबाद ग्रामीण या भागात हैदोस घातलेला आहे. या टोळीने 2011 मध्ये दोन खुनांचा प्रयत्न, 2013 आणि 2014 मध्ये तीन खून केल्याचे चावरिया यांनी सांगितले. आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली. पत्रपरिषदेला सहा.पोलिस आयुक्त गणेश राठोड, पोलिस निरीक्षक राजकुमार डोंगरे, गोरख चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक हरीश खटावकर उपस्थित होते.
आरोपींनी केलेले गुन्हे
स्वप्निल - खुनाचा प्रयत्न (कलम 307), खून (कलम 302)
श्रीकांत व राकेश - खंडणी (398), खून (302), खुनाचा प्रयत्न (307)
अमोल - खून (302), खुनाचा प्रयत्न (307), दरोड्याची तयारी (399)