आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

16 लाख रुपये लुटले; एक गजाआड, दुसरा ताब्यात; सेंट लॉरेन्सची कॅश पळवण्याच्या घटनेची पुनरावृत्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- एटीएममध्ये कॅश भरण्यासाठी थांबलेल्या व्हॅनचे चाक पंक्चर करून वाहनातील सोळा लाख रुपये लंपास केल्याचा प्रकार एन-1 पोलिस चौकीसमोर गुरुवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी पोलिसांनी व्हॅनचालक अशोक चाबुस्वारला अटक केली असून कॅश कस्टडीयन अनिल गावंडेला ताब्यात घेतले आहे. 21 जून रोजी सिडको एन-4मध्ये सेंट लॉरेन्स शाळेचे 52 लाख रुपये शाळेच्याच कर्मचा-यांनी लुटण्याचा प्रयत्न केला होता. आजचा प्रकार त्याचीच पुनरावृत्ती आहे.
जालना रोडवरील कॉर्पोरेशन बँकेच्या मुख्यालयातून लॉगी कॅश सोल्यूशन प्रा. लि. च्या कॅश कस्टडीयन अनिल गावंडे आणि व्हॅनचालक अशोक चाबुकस्वार यांनी शहरातील एटीएममध्ये भरणा करण्यासाठी 31 लाख रुपये घेतले. मुख्यालयालगत असलेल्या एटीएममध्ये त्यांनी पंधरा लाख रुपये भरले. ही रक्कम भरल्यानंतर त्यांनी सिडकोतील एलआयसी कार्यालयाजवळ असलेल्या एटीएममध्ये 16 लाख रुपये भरण्यासाठी कार वळवली. याच दरम्यान, इंजिनिअर सुनील श्रावण वाळके यांनी सिडको एन- 1 पोलिस चौकीसमोरील मशीन खराब झाल्याचा कॉल त्या दोघांना केला. या दोघांनी त्यांची कार थेट एन- 1 पोलिस चौकीसमोर असलेल्या एटीएम केंद्रावर नेली. व्हॅनमधील कॅश घेऊन ते दोघे एटीएममध्ये हजर झाले. मात्र, त्याठिकाणी अभियंता नव्हता. अर्ध्या तासानंतर अभियंता आल्यानंतर तिघांनी मिळून मशीन दुरुस्त केली व बाहेर आले असता व्हॅनचे समोरील चाक पंक्चर असल्याचे दिसले. सोबत असलेली कॅशची बॅग व्हॅनचालक चाबुकस्वार यांनी गाडीत टाकली. गाडी लॉक केल्याचे समजून त्यांनी गाडीचे चाक खोलण्याचा प्रयत्न करत असताना कोणीतरी दार उघडून व्हॅनमधील 16 लाख रोख असलेली बॅग लंपास केल्याचे समजले. या घटनेनंतर या दोघांनी घटनेची माहिती व्यवस्थापक दादाराव उर्किडे यांना कळवली. व्यवस्थापकाने या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. दुपारी तीन ते सायंकाळी 8.30 वाजेपर्यंत दोघांची कसून चौकशी सुरू होती. दोघावर संशय असल्याने रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी केली जात होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपायुक्त अरविंद चावरिया, सहायक पोलिस आयुक्त गणेश राठोड, अविनाश आघाव व शिवा ठाकरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

पोलिसांचा संशय त्या दोघांवरच
भरदुपारी पोलिस चौकीसमोरून सोळा लाखांची बॅग लंपास केल्याचा बनाव हे दोघे करत असल्याचा संशय पोलिसांना आला. त्या दोघांची चौकशी करून त्या एटीएममधील सीसीटीव्ही कॅमे-याचे आणि कॉल डिटेल तपासण्याचे काम सुरू केले आहे. यामध्ये त्या दोघांनी कट रचून ही रक्कम लंपास केल्याच्या संशयावरून चाबुकस्वारला अटक करण्यात आली असून गावंडेला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस निरीक्षक अशोक सोनवणे यांनी दिली.

असा घडला घटनाक्रम
12 : 30 दुपारी 31 लाख काढले
01 . 00 : जालना रोड एटीएम 15 लाख भरले
01 : 10 : मिनिटांनी व्हॅन सिडकोकडे निघाली
01 : 15 : अभियंता सुनील वाळके यांचा कॉल

01 : 30 : व्हॅन सिडको एन 1 पोलिस चौकीसमोर पोहोचली
02. 00 : अभियंता आला
02 : 20 : मशीनची दुरुस्ती
02 : 25 : एटीएममधून बाहेर पडताच व्हॅनचे चाक पंक्चर असल्याचे दिसले
02 : 30 : व्हॅनचे चाक उघडताना बॅग लंपास