आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेट बँकिंगद्वारे एक लाखाला गंडवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज- बँकअधिकारी बोलत असल्याचे भासवून मोबाइलवर खाते क्रमांकासह इतर माहिती घेऊन भामट्याने एका बँक ग्राहकाला नेट बँकिंगच्या माध्यमातून सुमारे एक लाख रुपयांचा गंडा घातला. हा प्रकार वाळूज एमआयडीसीत गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडला.

वाळूज एमआयडीसीतील एका कंपनीत दत्तात्रेय जोशी हे उच्च पदावर कार्यरत आहेत. त्यांचे आयसीआयसीआय बँकेत सॅलरी अकाउंट आहे. जुलै रोजी ते कंपनीतील कामकाज करत असताना ९१९६६११३६८१६ या क्रमांकावरून त्यांच्या मोबाइलवर कॉल आला. फोन करणाऱ्याने आपण आयसीआयसीआय बँकेतून मिश्रा बोलत असून आपले नाव दिनकर जोशी आहे ना, अशी विचारणा केली. तेव्हा जोशी यांनी होकार दिल्यानंतर भामट्याने त्यांना तुमचा केवायसी फाॅर्म भरलेला नाही. त्यासाठी आपल्या खात्याची माहिती देण्यास सांगितले. त्यामुळे जोशी यांनी त्या भामट्याला इत्थंभूत माहिती दिली. त्यानंतर जोशी यांच्या मोबाइलवर चार मेसेज आले. काही वेळानंतर त्यांच्या बँक खात्यावरून सुमारे एक लाख रुपये काढून घेण्यात आल्याचा मेसेज आला. त्यामुळे जोशी यांनी संबंधित खात्यातील पैशाची शहानिशा केली तेव्हा त्यांना एक लाख रुपये नेट बँकिंगद्वारे लुबाडल्याचे समोर आले. जोशी यांनी तातडीने वाळूज एमआयडीसी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली.

नागरिकांनी बँकेतून बोलत असल्याचे किंवा तुम्हाला बक्षीस लागल्याचे अामिष दाखवून फोन आल्यास कोणत्याही व्यक्तीवर विश्वास ठेवून आपली वैयक्तिक माहिती देऊ नका. त्याबाबत खात्री करून घ्या. काही संशयास्पद वाटल्यास पोलिसांशी संपर्क साधा, असे आवाहन पोलिस निरीक्षक रामेश्वर थोरात यांनी केले.