आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रॉबर्ट गिलच्या पणतूचे डोळे पाणावले!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अजिंठा - अजिंठय़ाच्या डोंगररांगांत बहरलेल्या रॉबर्ट गिल-पारो प्रेमकहाणीतील नायकाचा पणतू बी. लॉरिमर रविवारी अजिंठा परिसरात आला. दोन दिवसांच्या वास्तव्यात त्याने पारोची समाधी आणि गिलच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेतले. गिलचे वास्तव्य असलेल्या गिल टोपलाही त्याने भेट दिली. भग्नावस्थेतील ही वास्तू पाहून त्याच्या तोंडून उत्स्फूर्तपणे ‘अमेझिंग’ एवढेच उद्गार निघाले. अजिंठा लेणीतील चित्रे पाहताना भावुक झालेल्या लॉरिमरला रडू कोसळले.
इंग्रज राजवटीच्या काळात बहरलेली रॉबर्ट-पारोची प्रेमकहाणी ‘अजिंठा’ या नितीन देसाई यांच्या चित्रपटामुळे पुन्हा चर्चेत आली. रॉबर्ट यांचा पणतू बी. लॉरिमरने ब्रिटनमध्येच हा चित्रपट बघितला होता. तेव्हापासून त्याला भारताची ओढ लागली होती. खासकरून अजिंठा लेणी, तेथील पेंटिग्ज आणि पारो याविषयी त्याच्या मनात कुतूहल होते. पणजोबांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आजी-आजोबांकडून त्याने अल्बमही आणला होता. व्हय़ू पॉइंटवरून त्याने पणजोबांप्रमाणे छायाचित्रेही काढली. त्यानंतर लेणी क्रमांक 1 मधील बोधिसत्त्व, पद्मपाणी, वज्रपाणी हे चित्र पाहिले. लेणी क्रमांक 17 मधील बुद्धांना झालेल्या ज्ञानप्राप्तीचे आणि नंतर राजमहाल सोडून जातानाचे चित्र पाहून लॉरिमरला भावनावेग अनावर झाला. सोमवारी लॉरिमरने पारोच्या समाधीचे दर्शन घेतले. तेथे पुष्पगुच्छ अर्पण करून र्शद्धांजली वाहिली. नंतर गिलटोप बारादरी बघितली. पणजोबाचे निवासस्थान बघून तो भारावून गेला आणि ‘अमेझिंग’ (उत्कंठावर्धक) एवढीच प्रतिक्रिया व्यक्त केली.
* अजिंठा लेणीला भेट देण्याची फार दिवसांची इच्छा होती. ती आज पूर्ण झाली. पणजोबांचे निवासस्थान, त्यांचा इतिहास पाहून छान वाटले. येथील लोकांचे अजूनही त्यांच्यावर प्रेम असल्याचे पाहून भारावून गेलो आहे.’ - बी. लॉरिमर, रॉबर्ट गिलचा पणतू
लॉरिमर कोण? - अजिंठा लेणीचा शोध लागल्यानंतर ब्रिटिशांनी रॉबर्ट गिल यांना पेंटिंगसाठी अजिंठय़ात आणले होते. त्या रॉबर्ट गिल यांच्या मुलाच्या मुलाचा लॉरिमर हा मुलगा म्हणजेच रॉबर्ट यांचा पणतू. सध्या आयर्लंडमध्ये तो शिक्षण घेत आहे. त्याच्यासोबत चॅन अलेक्झांडर, सोचेहा मॅकिनी आले आहेत.