आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक डोळा निवडणुकीवर अन् दुसरा मंत्रिपदावर, युती झाल्यास शिरसाटांची शक्यता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- एप्रिल महिन्यात होत असलेल्या महापालिका निवडणुकीत आपापली ताकद दाखवायला भाजप आणि शिवसेना पुन्हा सरसावत असून त्यासाठी स्थानिक नेत्याकडे मंत्रिपद यावे यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. भाजपकडून अतुल सावे व हरिभाऊ बागडे ही दोन नावे शर्यतीत आहेत. तर युती होण्याची शक्यता असल्याने शिवसेनेचे संजय शिरसाटही शर्यतीत आहेत. येत्या काही दिवसांत हे चित्र स्पष्ट होणार आहे. विधानसभा निवडणुका स्वतंत्रपणे लढलेल्या शिवसेना व भाजपची आता युती होण्याची शक्यता दिसत आहे. त्या दृष्टीने मुंबईत हालचालींना वेग आला आहे. निर्णय काय होतो याकडे दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. या निर्णयावर दोन्ही पक्षांच्या महापालिका निवडणुकांबाबतच्या हालचाली अवलंबून आहेत.

दोन्ही पक्षांना हवे मंत्रिपद
राज्यात सरकार आलेले असल्याने भाजपला त्याचा मनपा निवडणुकीत फायदा घेण्यासाठी औरंगाबादसाठी मंत्रिपद हवे आहे. शुक्रवारी पहिल्या टप्प्याच्या शपथविधीत औरंगाबादच्या कुणाचा समावेश नव्हता, पण दुसऱ्या टप्प्यात समावेश करावा लागणार आहे. जिल्ह्यातील तिघे मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. त्यात पूर्वचे आमदार अतुल सावे, फुलंब्रीचे आमदार हरिभाऊ बागडे व गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांचा समावेश आहे. दुसरीकडे, युती होण्याची शक्यता असल्याने शिवसेनेतही हालचाली सुरू झाल्या असून मराठवाड्यातून अर्जुन खोतकर व संजय शिरसाट यांची नावे चर्चेत आली आहेत.
मंत्रिमंडळ विस्तारात कोणत्या आमदाराची वर्णी लागणार ?
का हवे मंत्रिपद?
मंत्रिपद असेल तर सरकारच्या माध्यमातून शहरासाठी निधी आणताना अडचण होत नाही व मंत्रिपदाच्या माध्यमातून कामे करून मतदारांवर प्रभाव टाकता येऊ शकतो ही यामागची भूमिका आहे. याशिवाय निवडणुकीत आवश्यक असणाऱ्या अनेक यंत्रणा मंत्रिपदाच्या माध्यमातून हाताळता येतात. त्यासाठी शर्यतीला वेग आला आहे. शिवसेनेच्या तुलनेत भाजपमध्ये शर्यत तगडी आहे.
सावे नवे, बागडे अनुभवी
औरंगाबाद मनपाच्या निवडणुकीत कोणाला मंत्रिपद देणे फायदेशीर ठरेल याबाबत तर्कवितर्क केले जात आहेत. राजेंद्र दर्डा यांना पाडून जायंट किलर ठरलेले नवे अतुल सावे यांचा शहरी चेहरा, त्यांची उद्योजक पार्श्वभूमी शहरासाठी फायदेशीर ठरेल, असे मानणारा भाजपमध्ये एक गट आहे. दुसरीकडे अनुभवी हरिभाऊ बागडे आहेत. त्यांचा शहरी तसेच ग्रामीण भागावरही प्रभाव असल्याने त्यांचेही नाव चर्चेत आहे. दोघांपैकी एकाचा दुसऱ्या टप्प्यात समावेश होण्याची दाट शक्यता आहे. या दोन्ही नेत्यांचे मुंबईत जोरदार लॉबिंग सुरू आहे.