वाळूज- रांजणगाव शेणपुंजी शिवारातील नाल्यामध्ये सोमवारी सकाळी पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. या मृतदेहाची अवस्था बघून घटनास्थळावरच शवविच्छेदन करण्यात आले. हा घातपाताचा प्रकार आहे की अन्य कारणामुळे मृत्यू झाला, याचा उलगडा शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच होणार असल्याचे पोलिस निरीक्षक इंदलसिंग बहुरे यांनी सांगितले.
याबाबत अधिक माहिती अशी की, औद्योगिक परिसराच्या मध्यभागी असणा-या रांजणगाव शेणपुंजी येथील कांताराव यशवंत जोशी यांच्या मालकीची गट नंबर 40 मध्ये जागा आहे. याच जागेतून रांजणगाव पाझर तलावातून पुढे जोगेश्वरी येथील परदेसवाडी तलावाला जोडणारा नाला जातो. या नाल्यामध्ये 35 ते 40 वर्षे वयोगटातील पुरुष जातीचे अनोळखी प्रेत भंगार गोळा करणाऱ्या महिलेला सोमवारी (3 नोव्हेंबर) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास दिसले. याबाबत महिलेने लगतच्या स्वामी धरमकाटा येथील मालकाला सदरची माहिती दिली. त्यांनी ही माहिती गावचे पोलिस पाटील बबन नाना सवई यांना िदली. सवई यांना माहिती मिळताच त्यांनी फोनद्वारे वाळूज एमआयडीसी पोलिसांना सदरची माहिती दिली.
फौजफाट्यासह पोलिस दाखल
माहिती मिळताच पोलिस निरीक्षक बहुरे, पोलिस उपनिरीक्षक अजयकुमार पांडे, पोलिस कॉन्स्टेबल गिरिजानंद भक्त, बाळासाहेब आंधळे, एस. आर. म्हस्के, एस. एम. रोकडे, वाय. एस. डफळ, बी. पी. जगताप, तातेराव शिनगारे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृताच्या अंगावर काळसर रंगाचा चौकडा शर्ट होता. मृतदेह अंदाजे 15 ते 20 दिवसांपासून पाण्यात असल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला. मृतदेह पाण्यात असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली नाही, त्यामुळे नाल्यात मृतदेह असल्याचे लक्षात येण्यास अधिक दिवस लागले. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जागेवरच शवविच्छेदन
मृतदेहाची अवस्था पाहता जागेवरच शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याकरिता घाटी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते. त्यानंतर मिळणा-या अहवालावरून पुढील तपासाला योग्य दिशा मिळणार आहे.