आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइल कंपन्यांकडे १० कोटींची थकबाकी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरात विविध मोबाइल कंपन्यांचे टॉवर असून त्यांच्याकडे ११ कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे या कंपन्यांच्या फोरजीचे खोदकाम मनपाच्या वतीने थांबवण्यात आले आहे. शहरातील शैक्षणिक संस्थांकडेही १० कोटी ६७ लाख रुपये बाकी असल्याचे समोर आले आहे.
स्थानिक संस्था कर अर्थात एलबीटी हा महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत होता. तो बंद करण्यात आल्यामुळे महानगरपालिका डबघाईला येत आहे. दुसरीकडे मनपाचे कोट्यवधी रुपये व्यावसायिकांकडे बाकी असल्याचे स्मार्ट सिटीच्या नियोजनापूर्वी समोर आले आहे. स्मार्ट सिटीसाठी पहिल्या टप्प्यात ५० कोटी रुपये उभे करण्याचे आव्हान मनपापुढे आहे. हे आव्हान पेलण्यासाठी मनपाच्या वतीने तयारी करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मनपाला विविध संस्थांकडून येणे असलेल्या थकबाकीची माहिती घेण्यात आली. यात रिलायन्स, टाटा, जीटीएल आणि एअरटेल या कंपन्यांकडे ११ कोटी रुपये बाकी असल्याचे समोर आले. यात रिलायन्स कंपनीकडे सर्वाधिक चार कोटी रुपये बाकी आहेत. ही थकबाकी अधिक कठोरपणे वसूल होण्यासाठी मनपाच्या वसुली विभागाने या कंपन्यांचे फोरजीसाठी शहरात सुरू असलेले खोदकाम बंद पाडण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

करवसुलीला जोर
सध्या विविध मोबाइल कंपन्यांकडे टॉवरची मोठी थकबाकी असून ती भरण्यासाठी त्यांचे फोरजीचे काम थांबवण्यात आले आहे. शैक्षणिक संस्थांनाही घरगुती कर लावला असून थकबाकी असलेल्या कराची वसुली करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. शिवाजी झनझन, मालमत्ता अधिकारी

शैक्षणिक संस्थांकडेही दहा कोटी ६७ लाख
शहरातील२५८ शैक्षणिक संस्थांनी २००६ पासून कोणताच कर भरलेला नाही. त्यामुळे त्यांच्याकडे १० कोटी ६७ लाख रुपयांची थकबाकी असल्याचे समोर आले. या सर्व शैक्षणिक संस्थांना घरगुती कर आकारण्यात येत आहे. मात्र, संस्थांकडून करच भरण्यात आला नाही. तो वसूल करण्याच्या दृष्टीनेही तयारी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.