आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद जिल्ह्यात संघाच्या शाखा ८६ वरून ४३० होणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - केंद्रात सत्ता आल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देवगिरी प्रांतात "महासंगम'च्या निमित्ताने संघविस्तारावर भर दिला आहे. देवगिरी प्रांतातील संघाच्या शाखा पाचपट वाढवण्याचे धोरण ठरवण्यात आले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात संघाच्या शाखा ८६ वरून ४३० करण्यात येणार आहेत. तर देवगिरी प्रांतात साडेसातशे शाखा असून त्या ४ हजार करण्याचे संघाने ठरवले आहे.

११ जानेवारीला संघाच्या वतीने देवगिरी महासंगम भरवण्यात येत आहे. त्यासाठी जोरदार तयारी करण्यात येत आहे. आत्तापर्यंत ६० हजार स्वयंसेवकांची नोंदणी झाली असून या निमित्ताने संघाने सर्वत्र शाखाविस्तारावर भर दिला आहे.

संघाच्या देवगिरी प्रांतामध्ये मराठवाड्यातील आठ तसेच खान्देशातील धुळे, जळगाव, नंदुरबार असे अकरा जिल्हे येतात. संघाच्या सोयीसाठी त्याचे पंधरा जिल्हे करण्यात आले आहेत. यामध्ये औरंगाबाद ५८ आणि ग्रामीण २८, तर जालना ४४, परभणी ४४, नांदेड ३५, किनवट ३१, हिंगोली ४५, लातूर ६६, बीड २६, बीड पूर्व २६, उस्मानाबाद ६४, जळगाव ८०, भुसावळ ७१ अशी जिल्हानिहाय शाखांची संख्या आहे. महासंगमसाठी ४००० गावांतून स्वयंसेवक येणार आहेत. यामध्ये तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळेे येणाऱ्या स्वयंसेवकावर त्याने गावात जाऊन शाखा सुरू करण्याची तसेच जिल्हा संघचालकावरही शाखा वाढवण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. त्या दृष्टीने पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात येत आहेत.

शाखेच्या माध्यमातून ग्रामीण भागात विस्तार
संघाच्या देवगिरी प्रांताची स्थापना २००० मध्ये करण्यात आली. त्यानंतर पहिल्यांदाच इतका मोठा कार्यक्रम घेण्यात येत आहे. विदर्भ तसेच इतर भागांच्या तुलनेत मराठवाड्यात ग्रामीण भागात संघाचे फारसे प्रस्थ नाही. त्यामुळे या माध्यमातून संघाला मराठवाड्यात पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सध्या मराठवाड्यात संघाच्या शाखेत किमान २० पासून ते ८० लोक येतात. ही संख्या वाढावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

महासंगमच्या निमित्ताने शाखा वाढवणार
-मराठवाड्यात पहिल्यादांच इतक्या मोठ्या प्रमाणात संघाचा कार्यक्रम होत आहे. या माध्यमातून जास्तीत जास्त शाखा वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. संघाच्या माध्यमातून स्वयंशिस्तीचे आणि राष्ट्रभक्तीचे धडे दिले जातात. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषणाच्या आणि महासंगमच्या प्रेरणेने शाखेची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल. त्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
अनिल भालेराव, विभाग संघचालक

पाच पट शाखा वाढवणार
-आत्तापर्यत ६० हजार स्वंयसेवकाची नोंदणी झाली आहे. चार हजार गावातून स्वयंसेवक येत आहेत. या महासंगमच्या निमित्ताने पाच पट शाखा वाढवण्याचे ठरवण्यात आले आहे. त्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. पहिल्यांदाच इतका भव्य कार्यक्रम होत असल्यामुळे संघातही उत्साह आहे. यामध्ये तरुणांची संख्या सर्वाधिक आहे.
वामन देशपांडे, प्रचार प्रमुख देवगिरी प्रांत