आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारी खर्चाने संघासाठी दक्ष; शेतकरी आणि दुष्काळाकडे मात्र दुर्लक्ष!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समन्वय शिबिरानिमित्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, हंसराज अहिर, प्रकाश जावडेकरांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे काही मंत्री असा ८ ते १० मंत्र्यांचा लवाजमा रविवारी दिवसभर औरंगाबादेत राहणार आहे. दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांची दुरवस्था प्रत्यक्ष पाहण्यासाठी मात्र मंत्रिमहोदयांनी वेळ काढलेला नाही. नाही म्हणायला त्यांचा हा दौरा शासकीय ठरवून खर्च सरकारी तिजोरीत टाकण्यासाठी राज्याचे मंत्री विभागीय आयुक्तालयात आढावा बैठकीचा सोपस्कार तेवढा पूर्ण करणार आहेत.

संघाच्या पत्रकानुसार शनिवार व रविवार असे दोन दिवस देवगिरी प्रांताचे प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची बैठक बीड बायपासवरील एका लॉनवर होत आहे. ३०० पेक्षा अधिक कार्यकर्ते येतील. गडकरी, जावडेकर आणि खते व रसायन राज्यमंत्री अहिर यांचे शासकीय दौरे मिळाले आहेत. परंतु दुष्काळ डोळ्याने पाहण्याची तसदी मंत्र्यांनी घेतली नसल्याचेच त्यावरून स्पष्ट होते.
अाढावा बैठक दाखवून दाैरे केले अधिकृत
मुख्यमंत्र्यांसह भाजपचे सर्व मंत्री बैठकीला अपेक्षित आहेत. केवळ संघाच्या समन्वय बैठकीसाठी ते आले असते तर त्यांचे दौरे खासगी ठरले असते. त्यामुळेच लगोलग सोमवारी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्तालयात आढावा बैठक ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आपसूकच मंत्र्यांचे दौरे अधिकृत झाले असून, खर्चाचा भार सरकारी तिजोरीवर पडणार आहे.
गडकरी सायंकाळी परत : रविवारी सकाळच्या विमानाने आगमन. बैठकीनंतरचा वेळ राखीव दिसतो. सायंकाळी विमानाने दिल्लीकडे रवाना.
अहिर मुक्कामी राहणार : हंसराज अहिर रविवारी येथे येणार असून त्या दिवशी मुक्कामी आहेत. सोमवारी सकाळच्या विमानाने परत जातील.

जनतेला खरा चेहरा दिसतो आहे
शेतकरी मेला तरी चालेल, आम्ही संघ शिस्तीत राहणार हे भाजपचे धोरण आहे. शेतकरी किंवा जनतेशी त्यांना काहीही देणेघेणे नाही. त्यांचा खरा चेहरा आता उघडा पडू लागला आहे.
अब्दुल सत्तार, आमदार, काँग्रेस
दुष्काळ पाहणीची मागणी करू
सोमवारी मंत्री दुष्काळाचा आढावा घेतील. त्यानंतर मंत्रिगण पुन्हा पाहणी करू शकतात. मराठवाड्यात येणाऱ्या मंत्र्यांचे दुष्काळाकडे दुर्लक्ष नाही. त्यासाठी आम्हीही संघटना म्हणून मागणी करूच. डॉ. भागवत कराड, प्रदेश उपाध्यक्ष, भाजप