आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • RSS Decision To Set Up Grand Medical College, Aurangaabada, Maharashtra

महासंगमच्या जागेवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ उभारणार भव्य मेडिकल कॉलेज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सरसंघचालकांच्या उपस्थितीत झालेल्या महासंगम सोहळ्यानंतर बीड बायपास रोडवरील ‘त्या’ जागेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. या शंभर एकर जागेपैकी २५ एकर जागा तत्काळ हेडगेवार रुग्णालयाने विकत घेतली असून त्या जागेवर राज्यातील सर्वात मोठे मेडिकल कॉलेज तयार करण्याचा निर्णय संघ परिवाराने घेतला आहे. पुढील वर्षी या जागेवर नर्सिंग कॉलेज सुरू केले जाणार असून पुढील वर्षाच्या काळात मेडिकल कॉलेज सुरू होईल. या जागेच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्यासाठी हेडगेवार रुग्णालयाचे विश्वस्त थेट पंतप्रधानांना भेटून आले आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देवगिरी प्रांताचे भव्य शिबिर प्रथमच मोठ्या थाटात ११ जानेवारी रोजी औरंगाबादेत झाले. मागील दोन महिन्यांपासून या महासंगमाची तयारी स्वयंसेवक स्वत: करीत होते. या शिबिराला मिळालेला प्रतिसाद पाहता संघाने कंबर कसली. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या जागेवर राज्यातील भव्य मेडिकल कॉलेज तयार करण्याचा संकल्प केला. मागील काही वर्षांपासून हेडगेवार रुग्णालाय प्रशासन मेडिकल कॉलेजसाठी जागेचा शोध घेत होते. मेडिकल कॉलेज तयार झाल्यावर सर्वसामान्यांना त्याचा फायदा व्हावा व ते शहरालगत असावे यासाठी प्रयत्न सुरू होते. म्हणून प्रशासनाने प्रस्तावित कॉलेजच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधानांची भेट घेऊन आमंत्रणही दिले होते. संघाच्या महासंगम शिबिरानंतर हेडगेवार रुग्णालयाच्या प्रशासनाने तातडीने निर्णय घेत या पावन भूमीवरच मेडिकल कॉलेज उभारण्याचा निर्णय घेतला.
मार्चमध्ये येणार पंतप्रधान नरेंद्र मोदी
डॉ. हेडगेवार रुग्णालयाचे विस्तारीकरण पूर्णत्वास गेले आहे. त्यामुळे या रुग्णालयाचा एकत्रित लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हावा अशी परिवाराची इच्छा आहे. त्यासाठी रुग्णालय प्रशासनाने त्यांची थेट दिल्लीत जाऊन सप्टेंबर महिन्यात भेटही घेतली. त्या वेळी २१, २२ व २३ मार्च २०१५ ची तारीख देण्यावर मोदींनी संमती दर्शवली आहे. याच कार्यक्रमानंतर प्रस्तावित मेडिकल कॉलेजचे भूमिपूजन मोदींच्या हस्ते करण्याचा प्रस्तावही पंतप्रधान कार्यालयास पाठवण्यात आला आहे.

मोदी येणार हे निश्चित
डॉ. हेडगेवार रुग्णालय लोकार्पण सोहळ्यासह राज्यातील सर्वात मोठ्या मेडिकल कॉलेजच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत. याच कार्यक्रमात मोदी हे राज्यातील पंधराशे डॉक्टरांशी संवाद साधणार आहेत.डॉ. अश्विनीकुमार तुपकरी, संचालक, हेडगेवार रुग्णालय