आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माध्यमांशी जवळिकीसाठी संघाची ‘दक्ष’ता; औरंगाबादेतही माध्यमांशी साधला संवाद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चिरेबंदी वाड्याचा पोलादी दरवाजा माध्यमांसाठी खुला होणे तर दूरच, कधी किलकिलाही झाला नाही. आजच्या युगात माध्यमांचे महत्त्व तसेच संघ स्थापनेपासून संघ आणि माध्यमांमध्ये असलेला दुरावा आता स्वत: संघालाच दूर करण्याची तीव्र गरज भासत आहे. यामुळे संघाने पहिल्यांदा उघडपणे माध्यमांसाठी संघ परिचय वर्गाचे आयोजन केले आहे. त्यानुसार शनिवारी औरंगाबादेत माध्यमांसाठी असाच परिचय वर्ग पार पडला.
सध्याच्या काळात मीडियाचा जनमानसावर जबरदस्त प्रभाव आहे. स्थापनेपासून ९० वर्षांच्या काळात संघाने प्रसिद्धि पराङ‌्मुखता जपली. संघाची कवाडे मीडियासाठी कधीच उघडली नाही. त्यामुळे संघाबाबत मीडियाही सुरक्षित अंतर राखूनच होता. परंतु अलीकडे संघालाही मीडियात आपले अस्तित्व असावे असे तीव्रतेने वाटायला लागल्याने पत्रकारांसाठी संघ परिचय वर्गांचे आयोजन होत आहे. रा. स्व. संघाविषयी माध्यम प्रतिनिधींना अतिशय जुजबी माहिती असते. संघाचा वेश आणि पट्टा यापलीकडे अनेकांना माहिती नसते. वरवरच्या माहितीमुळे अनेकदा नेमके वृत्तांकन होत नाही. त्यातून पत्रकारांसाठी परिचय वर्ग सुरू करण्याची कल्पना पुढे आल्याची माहिती विदर्भ प्रांत प्रचारप्रमुख अतुल पिंगळे यांनी दिली. संपूर्ण देशभरात ३९ विश्व संवाद केंद्रे आहे. त्यापैकी नागपूर, पुणे, औरंगाबाद व मुंबई अशी चार केंद्रे महाराष्ट्रात आहेत. ही केंद्रे त्यांच्या सोयीने संघ परिचय वर्गांचे आयोजन करतील. या केद्रांमार्फत विविध क्षेत्रातील लोकांना संघाविषयी माहिती व्हावी म्हणून परिचय वर्ग वा बैठकांचे आयोजन पूर्वीपासून केले जाते. ‘जाॅइन आरएसएस’ हे संकेतस्थळ संघाने चार-पाच वर्षांपूर्वी सुरू केले. या माध्यमातून डाॅक्टर, वकील, अभियंते, शिक्षण, अर्थ अशा विविध क्षेत्रांतील लोक संघाशी जुळत आहेत. संघाविषयी जाणून घेण्याच्या जिज्ञासेतून त्यांचे अनेक प्रश्न असतात. त्यातून त्यांच्यासाठी परिचय वर्ग घेणे सुरू झाले. २५-३० च्या गटात हे वर्ग घेण्यात येतात. २०१४ पासून त्यात पत्रकारांचाही समावेश करण्याचे ठरले. त्या नंतर पहिला संघ परिचय वर्ग पुण्यात झाला, अशी माहिती पिंगळे यांनी दिली.
स्तंभ लेखकांसाठीही वर्ग
वर्तमानपत्रातील स्तंभ लेखकांसाठीही वर्गांचे आयोजन केले जाते. तीन वर्षांपूर्वी ही कल्पना मांडण्यात आली. संघाच्या पाचही झोनमध्ये स्तंभ लेखकांसाठी वर्ग घेण्यात येतात. समाजातील विविध घटकांबाबत स्तंभ लेखक काय विचार करतात, त्यांचे चिंतन काय आहे, ते कोणते मुद्दे मांडतात, संघदृष्ट्या ते काही मुद्दे मांडू शकतील काय, अादी जाणून घेण्यासाठी वर्गांचे आयोजन होते. प्रत्येक प्रांताचे प्रत्येक वर्षाची कार्यक्रमपत्रिका ठरलेली असते. त्या नुसार यावर्षी पश्चिम झोनमध्ये स्तंभ लेखकांचे वर्ग घेण्यात येत आहे. पहिला वर्ग अहमदाबाद येथे आणि आता दुसऱ्या वर्गाला जयपूर येथे प्रारंभ झाला आहे. स्तंभ लेखकांची महिलाविषयक मांडणी आणि चिंतन हा या वर्गाचा विषय आहे. तर २०१३ मध्ये कोलकाता येथे आयोजित वर्गाचा विषय मुस्लिम विषयक दृष्टिकोन, चिंतन आणि मांडणी हा होता.
नागपुरात २५ मिनिटांचे पीपीटी
संघाचा जन्म, संघ स्थापनेमागील उद्देश, संघाची कार्यकारिणी, संघाची कार्यपद्धती, संघस्थानाला भेट देणाऱ्या महापुरूषांची माहिती, वर्तमान शाखा विस्तार आदींची माहिती देणारे २५ मिनिटांचे पाॅवर पाॅइंट प्रेझेंटेशन विश्व संवाद केंद्र, नागपूरतर्फे तयार करण्यात आले आहे. ते अधिक परिपूर्ण करून लवकरच त्याची सीडी सर्व विश्व संवाद केंद्रांना पाठवण्याचा विचार सुरू आहे. संघाच्या इतर प्रांतात त्यांच्या त्यांच्या सोयीने संघ परिचय वर्गाचे आयोजन केले जाते.
संघाची माहिती व प्रश्नोत्तरे
यापूर्वी दिवाळी वा अन्य निमित्ताने स्नेहमिलन आयोजित करून अनौपचारिकरीत्या परिचय करण्यात येत असे. मात्र तेवढे पुरेसे नसल्याने आणि त्यातून फारसे काही निष्पन्न होत नसल्याने थेट पत्रकारांसाठीच परिचय वर्ग घेण्याचे ठरले. २९ ऑगस्टला नागपूर येथे विश्व संवाद केंद्रातर्फे परिचय वर्ग घेण्यात आला. त्यानंतर शनिवार, १२ सप्टेंबर रोजी देवगिरी (औरंगाबाद) प्रांताचा पहिलाच संघ परिचय वर्ग पार पडला. संघाची वैचारिक भूमिका, संघाविषयीची तांत्रिक माहिती संघाचे पदाधिकारी देतात. त्यानंतर प्रश्नोत्तरे असा हा कार्यक्रम असतो.