आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळ निवारणासाठी संघाची समांतर योजना?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मराठवाड्यातील दुष्काळ निवारणासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यापूर्वीच कामाला लागला आहे. मात्र सरकार म्हणून काही कामे झाली पाहिजेत यासाठीही संघ आग्रही आहे. त्याच्या नियोजनासाठी संघाच्या वतीने शनिवारी विधानसभेचे अध्यक्ष, तीन मंत्री तसेच प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत भाग्यनगरातील ‘प्रल्हाद भवन’ येथे बैठक झाली. त्यात संघाने पक्षाला काही सूचना केल्याचे समजते.
विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मंत्री एकनाथ खडसे, बबनराव लोणीकर आणि गिरीश महाजन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे या बैठकीला उपस्थित होते. संघाच्या वतीने प्रांत प्रचारक रमानंद काळे, हरीश कुलकर्णी, मधुकर जाधव उपस्थित होते.

मंत्र्यांच्या दौऱ्यात या बैठकीचा उल्लेख असल्याने अशी काही बैठक प्रल्हाद भवन येथे होत असल्याचे माध्यमांना समजले. ही बैठक कशासाठी आयोजित केली होती, कोणत्या विषयावर चर्चा होणार होती, याची कोणतीही माहिती बाहेर देण्यात आली नाही. आयोजक तसेच विधानसभा अध्यक्ष आणि मंत्र्यांनाच या विषयाची माहिती होती. संघाच्या शिस्तीनुसार वेळेत ही बैठक सुरू झाली अन् शिस्तीत संपलीही. मात्र त्यात नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, त्यात कशाचे नियोजन झाले, काही निर्णय घेण्यात आले का, यावर कोणीही बोलले नाही.
प्रसिद्धिप्रमुख वामनराव देशपांडे यांच्याशी संपर्क साधला असता ते खासगी कामामुळे या बैठकीकडे गेले नव्हते. मात्र भारतीय जनता पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत दुष्काळ निवारणावर चर्चा झाल्याचे समजते. संघाच्या वतीने मराठवाड्यात ठिकठिकाणी कामे हाती घेण्यात आली असून त्याला चांगले यश येईल, असे संघाला वाटते. सरकार म्हणून भारतीय जनता पक्षाने काय केले पाहिजे, यावर या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. याचे प्रतिबिंब मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत दिसू शकते, असे संकेत पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी खासगीत बोलताना दिले आहेत.

संधी म्हणून बघा
मराठवाड्यातील दुष्काळाकडे सरकारने संधी म्हणून बघितले पाहिजे. आता ज्या उपाययोजना केल्या जातील त्या दुष्काळग्रस्तांच्या स्मरणात कायम राहतील. भविष्यात त्याचा फायदा पक्ष म्हणून होऊ शकतो. कदाचित झाला नाही तरीही ही संधी पक्षाने म्हणजेच सरकारने सोडता कामा नये. या दुष्काळाकडे संधी म्हणूनच बघितले पाहिजे, अशी सूचना या बैठकीत करण्यात आल्याचे समजते. अर्थात यास अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.