आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरटीई प्रवेशासाठी दुसऱ्या फेरीची तयारी, पहिल्या फेरीचे प्रवेश झाले नसताना केली जातेय घाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे २५ टक्के जागांवर आर्थिक मागास आणि दुर्बल घटकातील मुलांना प्रवेश देण्यात यावा असा नियम आहे. या वर्षी ३१ मे रोजी पहिला लकी ड्रॉ काढण्यात आला. यात नंबर लागलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी १० जूनपर्यंतची मुदत देण्यात आली. काही पालकांना शाळांचा पत्ताच सापडला नाही. त्यामुळे बरेचसे प्रवेश अद्याप पूर्ण झालेले नाहीत. असे असताना १५ जूनपासून दुसरी फेरी राबवण्याची तयारी सुरू झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
शाळांचा मनमानी कारभार आणि ऑनलाइनच्या अडचणीमुळेही प्रवेश प्रक्रिया यशस्वी होऊ शकलेली नाही. यंदा ही प्रक्रिया मार्चमध्ये सुरू करण्यात आली. ३१ मे रोजी पहिल्या फेरीसाठी लकी ड्रॉ काढण्यात आला.

दिलेल्या पत्त्यावर शाळाच नाहीत, ज्या शाळा आहेत ते संस्थाचालक प्रवेश देण्यास टाळाटाळ करत आहेत. तर काही ठिकाणी पालकांना शुल्क मागितले जात आहे. असे असतानाही जूनपासून सुरू झालेल्या या प्रवेशांमध्ये हजार १११ विद्यार्थ्यांपैकी १५०० जणांचे प्रवेश झाल्याचा दावा जिल्हा परिषद शिक्षण विभाग करत आहे. इतर नियमित शाळा या १५ जूनपासून सुरू होणार आहेत. मग पाल्यांना जर प्रवेशच मिळाला नाही तर आमची मुले शिक्षणापासून वंचित राहतील, अशी भीती पालकांनी व्यक्त केली. तर ज्या शाळा प्रवेश देण्यास टाळाटाळ करत आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, तसे पत्र पाठवले असल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. परंतु ठोस कारवाईच्या दृष्टीने कोणतेही पाऊल उचलले नसल्याची तक्रार पालक करत आहेत.

चूक शाळांची; फटका पालकांना
बऱ्याच शाळांनी ऑनलाइन नोंदणी करताना जो पत्ता दिला होता तोच लकी ड्रॉमध्ये दाखवण्यात आला. शाळा स्थलांतरित झाली तर त्याची माहिती शिक्षण विभागास देणे आवश्यक आहे. मात्र शाळांच्या चुकीचा फटका पालक आणि विद्यार्थ्यांना बसला आहे. आम्ही विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही. शाळांवर कारवाई करण्यात येईल. - आर. एस. मोगल, जिल्हापरिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी.
बातम्या आणखी आहेत...