औरंगाबाद - आर्थिक मागास विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेश प्रक्रियेसाठी आणखी आठवडाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत संकेतस्थळातील दोषामुळे खोडा निर्माण झाला आहे. ही प्रक्रिया पुढील आठवड्यात सुरू हाेण्याची शक्यता प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी आर. एम. मोगल यांनी वर्तवली.
शिक्षण संचालक महावीर माने यांनी जिल्ह्यातील शाळांना २९ फेब्रुवारी ते मार्च दरम्यान ऑनलाइन नोंदणी करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र ही मुदत उलटून आठ दिवस लोटले तरी ऑनलाइन नोंदणीसाठी संकेतस्थळातील अडथळे दूर होऊ शकले नाहीत.तर नाशिक, मुंबई, पणे येथे प्रवेश प्रक्रियेची दुसरी फेरी सुरू होणार आहे. संकेतस्थळातील अडथळ्यांमुळे औरंगाबादच्या प्रवेश प्रक्रियेत अडचणी येत आहेत. परंतु पुढील आठवड्यापर्यंत त्रुटी दूर होतील, असे शिक्षणाधिकारी मोगल यांनी सांगितले.