आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरटीओ कार्यालयात झेरॉक्स, अर्ज, वडापाव विक्री तेजीत सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात दलालांनी पुन्हा शिरकाव केला असून कार्यालयाच्या आत अर्ज, झेरॉक्स वडापाव विक्रीचा व्यवसाय तेजीत सुरू आहे. अधिकारी मात्र मूग गिळून गप्प आहेत.

जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात प्रादेशिक परिवहन अधिकारी गोविंद सैंदाणे यांनी कार्यालयाच्या आवारात खुर्ची- टेबल वाहनात बसून दलाली, चहा, वडापाव विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांना गेटबाहेर हाकलले होते. ज्यांचे काम त्यांनाच आत प्रवेश मिळत होता. यामुळे कामकाजात पारदर्शकता आली होती. सर्वसामान्य नागरिकांना स्वत:चे काम स्वत: करणे काहीसे सोपे झाले होते; पण अवघ्या सहा महिन्यांत पुन्हा जैसे थे स्थिती झाली आहे. अधिकारी, कर्मचारी कमी अन् दलालांचाच वावर अधिक आहे.

औरंगाबाद, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांचा प्रादेशिक परिवहन विभागात समावेश आहे. वाहन चालवण्याच्या परवान्यापासून ते वाहन पासिंगपर्यंतची सर्व कामे या कार्यालयातून होतात. यामुळे हजारो नागरिक कामानिमित्त सकाळपासून गर्दी करतात. मात्र, कर्मचाऱ्यांची संख्या बोटावर मोजण्याएवढीच आहे. त्यापेक्षा दलालांची संख्या दहा पटींनी अधिक आहे. दुसरी बाब म्हणजे अद्ययावत तंत्रज्ञानाचा अभाव आहे. अधिकाऱ्यांची सही वगळता दलाल आवश्यक त्या सर्व गोष्टींची पूर्तता करतात. यामुळे दलालांचा व्यवसाय चांगलाच फोफावला आहे. जास्त फंदात पडता लोक त्यांच्याकडूनच काम करून घेताना दिसतात. यामुळे सकाळपासून रात्री उशिरापर्यंत व्हॅन, रिक्षा, कार, दुचाकी, खुर्ची, टेबल टाकून आरटीओ कार्यालयात दलाल व्यवसाय करत आहेत. चहा, वडापाव, भजेही दणक्यात विक्री होत आहेत.

झगडेजाताच व्यवसाय बळावले : आरटीओकार्यालय दलालमुक्त व्हावे. नागरिकांना स्वत:चे काम स्वत: करण्याची सवय लागावी. अधिकारी कर्मचाऱ्यांना शिस्त लागावी यासाठी तत्कालीन परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी १९ जानेवारीपासून राज्यातील सर्व प्रादेशिक, उपप्रादेशिक कार्यालयांसाठी कडक नियम लागू केले होते. दलाल असेल तेथील अधिकाऱ्याला जबाबदार धरून निलंबनाच्या कारवाईचे निर्देश दिले होते. यामुळे औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाच्या आवारातील सर्व दलालांना बाहेर हाकलण्यात आले. ज्याचे काम त्यांनाच आत सोडले जात असे. पण झगडे यांची बदली झाली. त्यानंतर नागपूर न्यायालयाकडून वाहन चालक मालक संघटनेच्या प्रतिनिधींना आरटीओत काम करण्याची परवानगी मिळाली. पण गेटच्या आत वाहन, टेबल- खुर्ची टाकून व्यवसाय करण्याची कुणालाही परवानगी नसताना, नियम पायदळी तुडवून जागा मिळेल तेथे व्यवसाय केला जात आहे.

गुन्हे दाखल करणार
आरटीओ कार्यालयाच्या आवारात कुणालाही अर्ज विक्री करणे, झेरॉक्स काढून देणे, वडापाव, भजी विक्री करण्याची परवानगी दिलेली नाही. तरीदेखील काही लोक अशा प्रकारे व्यवसाय करताना दिसून येतात. त्यांना तोंडी समजावून सांगितले आहे. यापुढे ते खपवून घेतले जाणार नाही. नियमाचे उल्लंघन करून गेटच्या आत कुणी कोणताही व्यवसाय करत असल्याचे दिसून आल्यास त्याच्यावर अचानक पोलिसांची धाड टाकून अटक करण्यास सांगितले जाईल. फौजदारी गुन्हे दाखल केले जातील. गोविंदसैंदाणे, प्रादेशिक परिवहन अधिकारी
प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या आवारात झेरॉक्स आणि अर्ज विक्री सर्रास सुरू असून संगणकावर काम करून दिले जात आहे.