आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरटीओतील पसंती क्रमांकांच्या पावती पुस्तकांना फुटले पाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - काका, मामा, राजे, भाऊ, दादा, नवाब वाहनांवर लिहून मिरवणार्‍यांवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने वक्रदृष्टी टाकली आहे. पसंतीच्या क्रमांकाच्या रकमेवरून लेखा परीक्षण समितीने शंका व्यक्त केल्यानंतर ‘व्हीआयपीं’ना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नोटिसा मिळताच अनेकांनी पैसे भरल्याची पावती जमा केली. मात्र, पावती पुस्तकांना पाय फुटल्यामुळे एकच गोंधळ उडाला आहे.

या कार्यालयाचे सहा महिन्यांपूर्वी नागपूरच्या पथकाने लेखापरीक्षण केले. यात अनेक बाबींवर आक्षेप घेण्यात आले. प्रामुख्याने पसंतीचे क्रमांक देताना झालेल्या घोटाळ्याचा हिशेब सादर करण्याचे सूचित केले आहे. 2008 पर्यंत कार्यालयात ज्यांची चलती होती असे पसंतीचा क्रमांक पैसे न भरता घेत होते. वाहनधारकास पसंतीचा क्रमांक दिल्यानंतर ठराविक रक्कम भरण्याचे वाहनधारकास बजावले जात होते. अनेकांनी ‘व्हीआयपी’ नंबरसाठी रीतसर रक्कम भरली. काही चाणाक्ष कर्मचार्‍यांनी वाहनधारकास पैसे भरल्यानंतर पावती दिली. मात्र, ती रक्कम तिजोरीत जमा केलेली नाही. याच बाबीचा धागा पकडून लेखापरीक्षण समितीने चौकशी केली असता रकमेतही तफावत आढळून आली.

सर्वांनाच नोटीस : लेखापरीक्षणातील आक्षेपानंतर अधिकार्‍यांनी मागचा पुढचा विचार न करता पसंती क्रमांक घेतलेल्यांना नोटीस बजावून रक्कम भरण्याचे सांगितले. नोटीस मिळताच ज्यांनी पैसे भरले अशांनी कार्यालयात बाजू मांडली. प्रकरण दडपवण्यासाठी वाहनधारकांनाच अर्ज करण्याची सूचना करून पन्नास रुपये भरून घेत यादीतून नाव वगळण्याचा प्रताप सुरू केला आहे. ज्यांनी पैसे भरले नाहीत अशानाही व्हीआयपी क्रमांक देण्यात आले असून त्याचा शोध घेण्याची मागणी जोर धरत आहे.

लेखापरीक्षणातील आक्षेपानुसार नोटीस
लेखापरीक्षणामध्ये पसंतीच्या क्रमांकाच्या रकमेबाबत तफावत आल्याने आक्षेप नोंदवण्यात आला. वरिष्ठांच्या सूचनेनुसार आम्ही सर्वांनाच नोटीस बजावलेली आहे. 2008 पूर्वी संगणकीकृत क्रमांक दिले जात नसल्यानेच ही तफावत येत असेल. गणेश दगरे, सहा.प्रादेशिक परिवहन अधिकारी

पैसे भरल्याची पावती आमच्याकडे
पसंती क्रमांकासाठी नियमानुसार रक्कम भरली. आमच्याकडे पावती आहे. मात्र, त्याचे रेकॉर्ड कार्यालयात तपासले असता ते गायब असल्याचे दिसले. मनदीर देवकर, वाहनधारक

पसंतीच्या क्रमांकाचा मोठा घोटाळा असून यासंबंधी आरटीओंना भेटून चौकशीची मागणी केली. दोषींवर कारवाई करण्याची विनंतीही करण्यात आली आहे. विशाल परदेशी, लाभार्थी